ED Attaches Rs 100 Crore Properties Iinked With CM: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा दणका दिला आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी अर्थात 'मुडा' कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने ही कारवाई पीएमएलए कायद्याअंतर्गत केली आहे.
म्हैसूरच्या लोकायुक्त पोलिसांनी यापूर्वीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच इतरांविरोधात आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय. त्यासाठी राज्यपालांनी सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालविण्याची विशेष परवानगी दिली होती. ईडीने मंगळवारी एकूण 92 मालमत्ता जप्त केल्या. बाजार भावानुसार त्याचे मूल्य 100 कोटी रुपये आहे.
म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (मुडा) कसाबा होबळी येथील कसारे गावातील 3 एकर 16 गुंठे जमीन अधिग्रहीत केली. निवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी ही जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती. या जमिनीच्या बदल्यात सिद्धरामय्या यांच्या पत्नी आणि काही संबंधितांना म्हैसूरच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये एकूण 14 जागा दिल्याचा आरोप आहे. या संपत्तीची किंमत कोट्यवधी रुपये आहे. हा जमीन घोटाळा असल्याचा आरोप एका महिती अधिकार कार्यकर्त्याने केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडून केला जात आहे.
सिद्धरामय्या हे 20 मे 2023 पासून कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे. ते कर्नाटकाचे 22 वे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी 2013 ते 2018 पर्यंत राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवले होते. डी. देवराज उर्स यांच्यानंतर कर्नाटक राज्याच्या इतिहासात ते संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीसाठी पद भूषवणारे दुसरेच मुख्यमंत्री ठरले. काँग्रेसच्या या नेत्याने 2023 पर्यंत वरुणा विधानसभा मतदारसंघाचे , 2008 ते 2018 या 10 वर्षाच्या कालावधीत बदामी विधानसभा मतदारसंघाचे, 2018 ते 2023 पर्यंत बदामी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यापूर्वी 2004 ते 2007, 1994 ते 1999 पर्यंत चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आणि 1983 ते 1989 पर्यंत कर्नाटक विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. जनता दल आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे सदस्य असताना त्यांनी 1996 ते 1999 आणि 2004 ते 2005 पर्यंत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी 2019 ते 2023 आणि 2009 ते 2013 या काळात कर्नाटक विधानसभेत दोन वेळा विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले. सिद्धरामय्या अनेक वर्षे जनता परिवारातील विविध गटांचे सदस्य होते. सिद्धरामय्या यांना सिद्धू या टोपणनावाने देखील संबोधले जाते.