Marathi News> भारत
Advertisement

'रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचं लायसन्स, पासपोर्ट जप्त करणार'; ईदआधीच पोलिसांचा इशारा

Eid 2025 Police Warnning: ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी रस्त्यांवर नमाज पठण केलं जात असल्याचं दिसून येत. याचविरोधात पोलिसांनी इशारा दिला आहे.

'रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचं लायसन्स, पासपोर्ट जप्त करणार'; ईदआधीच पोलिसांचा इशारा

Eid 2025 Police Warnning: रमजान ईद अगदी दोन दिवसांवर आलेली असून ईद साजरी करण्यासाठी मुस्लीम बांधवांकडून विशेष तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. एकीकडे ईदचा उत्साह असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील मेरठ पोलिसांनी रस्त्यावर नमाज पठण करण्यासंदर्भात कठोर भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मेरठचे पोलीस निरीक्षक विपीन ताडा यांनी बुधवारी, "आम्ही मुस्लीम समाजातील धार्मिक नेत्यांना आवाहन करुन सांगितलं आहे की त्यांनी त्यांच्या सर्व अनुयायांना जवळच्या मशि‍दींमध्ये किंवा ईदगाहांमध्ये नमाज पठण करण्याच्या सूचना कराव्यात," असं सांगितलं. 

रस्त्यावर नमाज पठण करण्यास बंदी

कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर नमाज अदा करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं मेरठचे पोलीस निरीक्षक विपीन ताडा यांनी अगदीच स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे. "मागील वर्षीही आम्ही 200 लोकांविरोधात रस्त्यावर नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता," असं सांगायलाही ताडा विसरले नाहीत. यंदाच्या वर्षीही अशीच कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचं पोलीस निरिक्षकांनी स्पष्ट केलं आहे. "या वर्षीही आम्ही ड्रोन्स, सीसीटीव्ही आणि स्थानिकांच्या मदतीने परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. कोणीही रस्त्यावर नमाज पठण केलं तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे," असं पोलीस निरिक्षकांनी जाहीर केलं आहे.

पासपोर्ट आणि लायसन्स जप्त होणार

रस्त्यावर नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पासपोर्ट आणि ड्रायव्हींग लायसन्सही जप्त केलं जाईल असं पोलीस निरिक्षकांनी सांगितलं आहे. "रस्त्यावर नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तर पासपोर्ट आणि लायसन्स जप्त केलं जाईल. कोर्टाकडून सदर व्यक्तीला क्लिनचीट मिळत नाही तोपर्यंत पासपोर्ट आणि लायसन्स पोलिसांच्या ताब्यात राहील," असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करत अनेक संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  रस्त्यावर नमाज पठण केल्याने वाहतुककोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळेच पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

ईद कधी साजरी होणार?

केंद्र सरकारच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार, 2025 मध्ये ईद अल-फित्र 31 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. मात्र ईद कधी साजरी केली जाईल हे चंद्र कधी दिसतो यावर अवलंबून असणार आहे.

Read More