Nitin Gadkari Mega Mobility Plan: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय वाहतुकीची रुपरेषा बदलण्यासाठी एक प्रकल्प सादर केला आहे. या योजनेत टिकाऊ आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेले वाहतूक व्यवस्थेवर जोर दिला आहे. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत गडकरींना अनेक योजनांबद्दल माहिती दिली आहे. यात शहरातील इलेक्ट्रिक रॅपिड मास ट्रांन्झिस्ट, हायपरलूप कॉरिडोर आणि रोपवे व केबल कार सिस्टमचा समावेश आहे.
गडकरींनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नाविन्याला चालना देत आहोत. मास मोबिलिटीमध्ये एक क्रांती येणार आहे. भारताच्या पायाभूत सुविधांच्या भविष्याला आकार देण्यासाठी तंत्रज्ञान, उपलब्धता आणि पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मास मोबिलीटीचा अर्थ मोठ्या प्रमाणात वाहतूक म्हणजे लोकांना एकत्र प्रवास करण्यासाठी चांगले साधन प्रदान करणे.
राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर दररोज 100 किमी महामार्ग बांधण्याचे आणि 25,000 किमी दुपदरी रस्त्यांचे चार पदरीमध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट गडकरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, 2013-14 मध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी 91,287 किमी होती, जी आता1,46,204 किमीपर्यंत वाढली आहे. त्याचप्रमाणे, 2014 मध्ये हाय-स्पीड कॉरिडॉर 93 किमी होते, जे आता 2,474 किमी पर्यंत वाढले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे रस्त्यांचे निरीक्षण केले जाईल. महामार्गालगत 20-25 कोटी झाडे लावण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. पर्यावरण मंत्रालय 'ट्री बँक' योजनेचा विचार करत आहे.
दिल्ली आणि बेंगळुरूसारख्या शहरांसाठी मेट्रोनियो पॉड टॅक्सी, हायपरलूप ट्रान्सपोर्ट आणि एलिव्हेटेड पिलर-आधारित नेटवर्कसारखे पायलट प्रकल्प तयार केले जात आहेत, असं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसंच, तो दिवस दूर नाही जेव्हा शहरांमध्ये केबल-रन बसेस आणि विमानासारख्या सुविधांसह इलेक्ट्रिक रॅपिड मास ट्रान्सपोर्ट असेल. डोंगराळ आणि दुर्गम भागात 360 रोपवे आणि फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी 60 वर काम सुरू आहे. यामध्ये केदारनाथ सारख्या तीर्थस्थळांचाही समावेश आहे. या प्रणालींचा उद्देश डोंगराळ भागातील प्रदेशात सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक प्रदान करणे आहे. फ्युनिक्युलर रेल्वे ही एक प्रकारची ट्रेन आहे जी उतारावर धावते.
नागपुरात 135 आसनी इलेक्ट्रिक बसेससाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या बसेस ताशी 120-125 किमी वेगाने धावू शकतात. यामध्ये प्रीमियम सीटिंग आणि एअर कंडिशनिंग सारख्या सुविधा असतील. या बसेस 30-40 मिनिटांत चार्ज होतील. दिल्ली-जयपूर आणि मुंबई-पुणे सारख्या आंतरशहर मार्गांवर धावण्यापूर्वी त्यांची चाचणी घेतली जाईल, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.