Shubhanshu Shukla axiom 4 : अवकाश क्षेत्रात भारताचं नाव आणखी उंचावणाऱ्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या एक्सिओम 4 (Shubhanshu Shukla axiom 4) या आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. सध्याच्या घडीला शुक्ला मागील 12 दिवसांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथं मुक्कामी असून त्यांच्या मोहिमेतील महत्त्वाचे टप्पे गाठत आहेत.
25 जून 2025 रोजी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर इथून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटनं शुक्ला आणि त्यांचे साथीदार अमेरिकेचे अंतराळवीर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उजनान्स्की विन्सिव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कपू हेसुद्धा त्यांच्यासोबत असून हा चमू 10 जुलैनंतर केव्हाही पृथ्वीवर परतू शकतो असं सांगण्यात आलं होतं.
10 जुलै हा दिवस उजाडला आणि शुक्ला यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम पृथ्वीवर परतणार याचे वेध अनेकांना लागलेले असतानाच युरोपीय अंतराळ संशोधन संस्था इएसएनं मात्र त्यांच्या या परतीच्या प्रवासात विलंब होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. हा चमू 14 जुलैपूर्वी परतणं शक्यच नाही म्हणजेच किमान 3 ते 4 दिवसांच्या दिरंगाईनं हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील असं म्हटलं जात आहे.
शुभांशू शुक्ला आणि एक्सिओम मोहिमेसाठी गेलेला त्यांचा संपूर्ण चमू काहीशा विलंबानं पृथ्वीवर परतणार म्हणताच अनेकांनाच भारतीय वंशाच्या आणि नासाच्या वतीनं अंतराळात गेलेल्या सुनीता विलियम्स यांच्या मोहिमेची आठवण झाली, जिथं त्यांचा दिवसांचा मुक्काम कैक महिने लांबला होता.
इथं शुक्ला आणि त्यांच्या टीमच्या परतीच्या प्रवासात हवामान बदल आणि काही तांत्रिक कारणं अडचणी निर्माण करु शकतात असं म्हटलं जात आहे. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे फ्लोरिडाच्या किनारपट्टी भागात बिघडलेलं हवामान.
एक्झिओम 4 ची संपूर्ण टीम ड्रॅगन कॅप्सूल ‘ग्रेस’च्या माध्यमातून पृथ्वीवर परतणार आहे. हे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर अटलांटिक महासागरात किंवा मेक्सिकोया खाडीमध्ये सॉफ्ट स्प्लॅशडाऊन होईल अर्था पाण्यात हळुवार उतरेल. मात्र जर या भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असला, पाऊस किंवा वादळी परिस्थिती असेल तर मात्र हे यान सुरक्षितरित्या इथं उतरवता येऊ शकत नाही.
युरोपीय अंतराळ संस्था आणि नासानं हवामानाचा आढावा घेत या परिस्तितीमुळं हा परतीचा प्रवास 14 जुलैपर्यंत लांबणीवर पडू शकतो अशी प्राथमिक शक्यता वर्तवली आहे. ज्यामुळं या मोहिमेत सहभागी असणाऱ्या अंतराळवीरांना आणखी काही दिवस आयएसएसवरच मुक्काम करावा लागू शकतो.
एक्झिओम 4 मोहिमेत सहभागी असणाऱ्या अंतराळवीराच्या परतीच्या प्रवासात काही टप्प्यांचा समावेश आहे.
तयारी- टीममधील सदस्यांनी या टप्प्यावर सर्व वैज्ञानिक प्रक्रिया पूर्ण करून प्रयोगाचे नमुने, बीज, माहिती कॅप्सुलमध्ये संग्रहित करणं अपेक्षित असतं.
आरोग्य तपासणी- परतीच्या प्रवासापूर्वी या अंतरावीरांची वैद्यकीय तपासणी होऊन ते पृथ्वीच्या वातावरणात परतण्यासाठी योग्य स्थितीत आहेत याची तपासणी केली जाईल.
अनडॉकिंग- या टप्प्यावर ड्रॅगन कॅप्सूल आयएसएसपासून वेगळं होईल. ही प्रक्रिया स्वयंचलित असेल. मात्र नासा आणि ग्राऊंड कंट्रोल क्रूचंही त्यावर नियंत्रण असेल.
रिएंट्री- अनडॉकिंगनंतर हे कॅप्सूल आयएसएसपासबव दूर जाऊन पृथ्वीवर परतण्यासाठी कक्षा निर्धारित करेल. या प्रक्रियेसाठी 28 तासांचा कालावधी लागेल. हे कॅप्सूल पृथ्वीच्या कक्षेत 28000 किमी प्रतितास इतक्या वेगानं प्रवेश करेल.
वातावरणात प्रवेश- ताशी 28000 किमी इतक्या प्रचंड वेगाने हे कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल यावेळी त्यावरील आवरणाचं तापमान साधाराण 2000 अंश सेल्सिअस इतकं असेल. यानंतर पॅराशूटच्या मदतीनं कॅप्सूलची गती कमी करून ते सुरक्षितरित्या समुद्रात उतरवलं जाईल आणि त्यातून अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जाईल.