कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (DGP) ओम प्रकाश यांच्या हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यांच्या पत्नीने हत्येची जबाबदारी घेतली असून, यामध्ये मुलीचाही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. ओम प्रकाश यांच्या मुलाने आपली आई आणि बहिणीवर वडिलांच्या हत्येचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. तपासात समोर आलं आहे की, जेव्हा हत्या झाली तेव्हा ओम प्रकाश जेवत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ओम प्रकाश डिनर टेबलवर माशांचा आस्वाद घेत असतानाच पत्नी पल्लवीने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानक चाकूने हल्ला केला. डिनर टेबलजवळ जेवणाची प्लेट पडलेली होती आणि दुसरीकडे ओम प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता.
घटनास्थळी ओम प्रकाश आणि पत्नी निलम यांच्यात संघर्ष झाल्याचे पुरावे सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांची हत्या केल्यानंतर आई आणि मुलीने स्वत:ला एका रुममध्ये बंद करुन घेतलं होतं. हल्ल्यानंतर पल्लवीने शेजारील महिलेला व्हिडीओ कॉल करुन हत्येची माहिती दिली. तिने आपल्या पोलीस पतीला सांगितल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलीस घरी पोहोचले असता तीन माळ्याच्या घरातील तळमजल्यावर ओम प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांची मुलगी कृतीने दरवाजा बंद केला होता आणि गोंधळ घालत होती. वारंवार विनंती केल्यानंतरही ती दरवाजा उघडत नव्हती. यानंतर पोलिसांना दरवाजा तोडून तिला ताब्यात घेतलं.
पल्लवीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं असून, हत्येची कबुली दिली आहे. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. दुसरीकडे मुलीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. माजी पोलीस महासंचालकांच्या हत्येमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास सुरु आहे.
बंगळुरुचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितलं आहे की, धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने माजी पोलीस महासंचालकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
पल्लवीने मडिवाला सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवला. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितलं होतं की ते त्यांच्या पत्नीकडून होणारा छळ सहन करू शकत नाहीत. प्राथमिक तपासात ओम प्रकाश यांच्या छातीत, पोटात आणि हातावर चाकूने वार करण्यात आले होते आणि त्यांच्या शरीरावर 8 ते 10 जखमा होत्या, असं समोर आले आहे. पोटाच्या भागात 4-5 जखमा होत्या, ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला आणि तोच त्याच्या मृत्यूचे कारण बनला.
डायनिंग हॉलची फरशी रक्ताने माखलेली होती, ज्यावरून असे दिसून येते की ओम प्रकाश मृत्यूपूर्वी सुमारे 15-20 मिनिटे संघर्ष करत होते. यादरम्यान, पत्नी पल्लवी पतीला वेदनेने तडफडताना पाहत राहिली असं सांगितलं जात आहे. मृत्यूनंतर, पल्लवीने एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून हत्येची माहिती दिली.