Marathi News> भारत
Advertisement

काश्मीरमध्ये ओलिसांची सुटका करताना चार भारतीय जवान शहीद

शनिवारी रात्री २१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान हंदवाडा येथील एका घरात शिरले. याठिकाणी दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते.

काश्मीरमध्ये ओलिसांची सुटका करताना चार भारतीय जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत पाच भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलांना यश आले. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये एक कमांडिंग ऑफिसर, मेजर आणि दोन जवानांचा समावेश आहे. तर एकजण स्थानिक पोलीस दलातील कर्मचारी होती.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री २१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान हंदवाडा येथील एका घरात शिरले. याठिकाणी दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी चार भारतीय जवान आणि एक स्थानिक पोलीस आतमध्ये गेले होते. यावेळी त्यांचा इतरांशी संपर्क तुटला. त्यामुळे भारतीय जवान घरातच अडकून पडल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. यानंतर आज सकाळी हे चार जवान आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्वजण घरात शिरल्यानंतर आधीपासूनच तिथे लपून बसलेल्या दहशतवादयांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. मात्र, घरात अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

तत्पूर्वी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला परिसरात पाकिस्तानकडून शुक्रवारी दुपारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेल्या बेछुट गोळीबारात भारताचे दोन जवान जखमी झाले होते. या जखमी जवानांचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

Read More