Marathi News> भारत
Advertisement

जगावर इंधन तुटवड्याचं संकट; कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडणार?

एकाबाजूला इराण इस्रायलमधील युद्धाचा भडका उडत असतानाच दुस-या बाजूला कच्चा तेलाच्या किमतीचाही भडका उडण्याची शक्यता आहे.

जगावर इंधन तुटवड्याचं संकट; कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडणार?

ब्युरो रिपोर्ट, झी २४तास : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने तेलपुरवठा करणा-या जहाजांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अरुंद होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे निम्म्या जगावर इंधन तुटवड्याचे व  दरवाढीचे संकट येऊ शकते. त्यामुळे आता भारतीयांचीही चिंता वाढली आहे.

एकाबाजूला इराण इस्रायलमधील युद्धाचा भडका उडत असतानाच दुस-या बाजूला कच्चा तेलाच्या किमतीचाही भडका उडण्याची शक्यता आहे. कारण जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार ज्या मार्गे केला जातो तो होर्मुझचा समुद्रमार्ग इराण बंद करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणी कायदेमंडळाकडून ही सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. आता केवळ इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. 

याच मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जातं. हा मार्ग बंद झाल्यास त्याचा मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. इराणच्या घोषणेनंतर लगेचच कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 80 डॉलरवर पोहोचले आहेत. आशियाई देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक महत्वाचा जलमार्ग आहे.

 होर्मुझ जलमार्गाचं महत्त्व काय? 

--आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्वाचा जलमार्ग 
--जलवाहतूक आणि ऊर्जा पुरवठा करणारी सामुद्रधुनी
--पर्शियन आखात आणि ओमानचा आखात यांना जोडते
--सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक 
--जगातील 20 टक्के इंधनाचा व्यापार चालतो
--जागतिक तेल धमनी अशी ओळख 
-भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील, तणावमुळे जलवाहतुकीला मोठा फटका बसतो.

भारताला लागणारं 50 टक्के तेल आणि नौसर्गिक वायू याच होर्मुझ सामुद्रधुनीतून येतं. त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केल्यास भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास पेट्रोल, ड़िझेलच्या दरात वाढ होईल त्यामुळे भारतीय चिंतेत आहेत. 

मात्र भारतीयांनी घाबरून जावू नये भारताकडे तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरींनी सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आमच्या तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे. तसेच काहींकडे 3 आठवडे पुरेल इतका साठा आहे. तर काहींकडे 25 दिवसांचा तेल साठा आहे. आम्ही इतर मार्गांवरून तेल पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व संभाव्य देशांच्या संपर्कात आहोत. मला वाटतंय घाबरण्याचं काहीच कारण नाही. 

इराण आणि इस्रायलच्या युद्धादरम्यान बाजारपेठेत निर्माण झालेली अस्थिरता लक्षात घेता भारताने आधीच रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवलीये. भारत रशियाकडून दररोज 20 ते 22 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करतंय. त्यामुळे इराण-इस्रायल युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने इतर देशांची चिंता वाढली आहे. मात्र असं असलं तरी भारताला सध्या मोठा फटका बसण्याची शक्यता कमी आहे. 

Read More