National Highway And Expressway: भारतात रेल्वेमार्गानं होणारा प्रवास अनेकांच्या प्राधान्यस्थानी असला तरीही काही मंडळी मात्र प्रवास लहान असो किंवा मोठा, कायमच रस्तेमार्गाला प्राधान्य देतात. विविध गावं, शहरं, जिल्हे आणि राज्यांना जोडणारे हे रस्ते सातत्यानं त्यांचं स्वरुप बदलताना दिसतात. त्यातच समृद्धी आणि तत्सम महामार्गांमुळं तर प्रवास अगदी सुस्साट सुरू आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. रस्ते मार्गानं प्रवास करण्याचा मुद्दा आला की एक्स्प्रेस वे आणि हायवेचा संदर्भ येतोच. पण, मुळात या दोन शब्दांमध्ये, या दोन प्रकारच्या रस्त्यांमध्ये काय आणि किती फरक आहे हे माहितीय?
भारत हे एक असं राष्ट्र आहे जिथं सथ्या एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हायवेच्या तुलनेत या एक्स्प्रेस वेवर अधिक वेगानं वाहनं चालतात. एक्स्प्रेस वे अधिक उंचीवर बांधलेले असून, त्यांच्यासाठी विविध प्रवेश आणि निकासमार्ग अर्थात एंट्री आणि एक्झिट पॉईंट देण्यात येतात. एक्स्प्रेस वेनं प्रवास करताना वाहनांना काही निवडक ठिकाणांवरूनच या रस्त्यावर प्रवेश करता येतो. हा एक असा रस्त्या आहे जिथं मोठी शहरं एकमेकांशी जोडली जातात.
भारतात एकूण 23 एक्स्प्रेस वे असून, 18 एक्स्प्रेस वेचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येतं. तर, देशभरातील हायवेंची एकूण संख्या आहे 599. हायवेची लांबी आहे 1.32लाख किमी. NH44 हा देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग असल्याचं सांगण्यात येतं, ज्याची लांबी आहे 3745 किमी. हा राष्ट्रीय महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत जातो.
हायवे अर्थात महामार्गांवर एक्स्प्रेस वे म्हणजेच द्रुतगती मार्गांच्या तुलनेत कमी टोल भरावा लागतो. काही अहवालांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वेची एकूण लांबी 4000 किमी इतकी आहे. सहसा एक्स्प्रेस वेवर सर्वाधिक वेगमर्यादा 120 किमी ठेवतच तयार करण्यात आलं आहे, तर हायवेवर मात्र ही मर्यादा ताशी 60/80 ते 100 किमी इतकी ठेवण्यात येते.