Indian Railway First Train: 16 एप्रिल 1853... हा तोच दिवस, जेव्हा भारतात पहिल्यांदाच रेल्वे रुळावरून रेल्वेचा प्रवास सुरू झाला होता. दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी 14 डब्यांची ही रेल्वे 400 प्रवाशांसह पहिल्या प्रवासासाठी रवाना झाली. ही ट्रेन रुळांवरून पुढे जातानाचं दृश्य त्या काळात इतकं भारावणारं होतं की, त्या काळात जे काही घडत होतं ते पाहण्यासाठी नागरिकांनीही रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी पळायला सुरुवात केली.
हे असं काहीतरी तेव्हाच्या काळात पहिल्यांदाच घडत होतं, जिथं सापाच्या शेपटीसारखी लांबलचक ट्रेन इंजिनातून धूर सोडत मोठ्या वेगानं पुढे चालली होती. काहींना तर या ट्रेनची इतकी भीती वाटली की तिची तुलना चक्क चालणाऱ्या राक्षसाशी करण्यात आली. मुंबईच्या बोरिबंदर इथून या ट्रेनचा प्रवास सुरू झाला होता. ज्यानंतर ती साधारण 1 तास 15 मिनिटांच्या प्रवासानंतर 34 किमीचं अंतर ओलांडून सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी ठाण्याला पोहोचली.
14 डब्यांची ही ट्रेन तीन डब्यांच्या इंजिनामुळं पुढं गेली. या ट्रेननं प्रवास करणाऱ्यांची जितकी गर्दी होती, तितकीच गर्दी ट्रेन पाहणाऱ्यांचीसुद्धा होती. डेक्कन क्वीन असं या ट्रेनचं नाव. नामांकित व्यक्ती या पहिल्यावहिल्या ट्रेनमध्ये प्रवासी होते. या क्षणाचं इतकं अप्रूप, की या ट्रेनला चक्क 21 तोफांची सलामीसुद्धा देण्यात आली होती.
या ट्रेनच्या इंजिनासाठी आणल्या गेलेल्या खास ब्रिटनहून मागवण्यात आलेल्या डब्यांना सुल्तान, सिंधु आणि साहिब असं नाव देण्यात आलं होतं. सुरुवातीला या ट्रेनची सुरुवातच मुळात ब्रिटीश राजवटीनं नफ्याच्या हेतूनं केली होती. मात्र खऱ्या अर्थानं भारतालाही पहिली ट्रेन मिळाली होती.
ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर जवळपास 200 वर्षांनंतर 1825 मध्ये ब्रिटनमध्ये पहिली रेल्वे धावली आणि 1832 मध्ये ब्रिटनच्याच धर्तीवर भारतात रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण, तेव्हा हा प्रस्ताव फारसा पुढे गेला नाही. 1848 मध्ये लॉर्ड डलहौजी जेव्हा भारताच्या गव्हर्नरपदी आले तेव्हा त्यांनी भारतात रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच त्यांना भारतातील रेल्वेचं जनक म्हटलं जातं.
पहिल्या रेल्वेची सुरुवात होणं हे भारताच्या दृष्टीनं एक क्रांतिकारी पाऊल होतं. ज्यानंतर हळुहळू देशात रेल्वेचा विस्तार झाला आणि नॅरोगेज, मीटरगेज, ब्रॉडगेज मार्गांवर रेल्वे धावू लागली. 1 मार्च 1969 मध्ये भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन सुरू झाली, दिल्ली ते हावडादरम्यानच्या अंतरात या रेल्वेनं प्रवास केला होता. तेव्हापासून सुरू असणारा हा रेल्वेचा प्रवास तब्बल 172 वर्षांनंतरही सुस्साट सुरू आहे.