Woman Gives Birth To 14th Child: असं म्हणतात की वेळीच मुलं-बाळ झालेलं बरं! वय वाढतं जात तसा प्रसुतीसाठी त्रास होतो आणि महिलांचं शरीरंही तितकीशी साथ देत नाही असं जुन्या पिढीतील लोक म्हणतात. मात्र उत्तर प्रदेशमधील हापुड येथे राहणाऱ्या इमामुद्दीन यांच्या घरातून 14 व्यांदा गोड बातमी आली आहे. या घरातील इमामुद्दीन यांची पत्नी गुडिया यांनी 50 व्या वर्षी 14 व्या मुलाला जन्म दिला आहे. गुडिया यांची 14 व्यांचा प्रसुती केल्यानंतर डॉक्टरही थक्क झाले आहेत. इमामुद्दीन यांच्या पत्नीने 14 व्या बाळाला जन्म दिल्याचं समजल्यानंतर दूर दूरचे नातेवाईक आणि ओळखीपाळखीचे लोक या दोघांना भेटायला येत आहेत. अनेकजण केवळ इमामुद्दीन, त्यांची पत्नी गुडिया आणि चिमुकल्याला बघायला येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हापुड येथील पिलखुवामधील बजरंगपुरीमध्ये राहणाऱ्या इमामुद्दीन यांची 50 वर्षीय पत्नी गुडिया यांच्या शुक्रवारी सायंकाळी प्रसूती कळा जाणवू लागल्या. त्यानंतर त्यांना पिलखुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना मेरठमधील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुडिया यांना 108 क्रमांकाच्या रुग्णलवाहिकेधून हापुड जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं. रुग्णालयात पोहचल्यानंतर गुडिया यांनी त्यांच्या 14 व्या बाळाला जन्म दिला.
दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दोघांनाही घरी पाठवण्यात आलं आहे. गुडिया यांचा सर्वात मोठा मुलगा 22 वर्षांचा आहे. गुडिया यांच्या मुलांमध्ये एका वर्षाचंही अंतर नाही. ज्यावेळी गुडिया यांनी बाळाला जन्म दिला त्यावेळी त्यांचा 22 वर्षांचा मुलगाही त्यांच्यासोबत रुग्णालयामध्ये होता.