Sheetal Murder News: हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा क्षेत्रातील धक्कादायक बाब समोर आली आहे. गावातील एका नाल्यात तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तरुणीच्या गळ्यावर वार केल्याचे निशाण होते. तपासादरम्यान तरुणीची ओळख पटली असून, पानिपत जिल्ह्यातील गाव खलीला माजरा येथे राहणारी शीतल अशी झाली आहे. शीतल चौधरी हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीत मॉडेल म्हणून काम करत होती. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हत्येचं कारण अजून समोर आलेलं नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल आपली बहिण नेहासह पाणीपतमध्ये वास्तव्यास होती. 14 जून रोजी ती अहर गावात शूटला गेली होती. नेहाच्या बहिणीने सांगितलं आहे की, शीतलने तिला तिच्या कामाच्या ठिकाणावरुन फोन केला होता. पूर्वाश्रमीचा प्रियकर सुनील आपल्याला मारहाण करत असून, जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे असं तिने मला सांगितलं होतं असा नेहाचा दावा आहे.
काही वेळाने नेहाने शीतलला फोन करण्याचा प्रयत्न केला असता, तो लागला नाही. जेव्हा ती घरी परतली नाही तेव्हा नेहाने ओल्ड इंडस्ट्रीय पोलीस स्टेशन गाठलं आणि बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला असता, खांडा गावातील नाल्यात मृतदेह आढळला.
नेहाने पोलिसांना सांगितलं की, सहा महिन्यांपूर्वी शीतल कर्नालच्या मॉडेल टाऊनमधील त्याच्या हॉटेल सुकुनमध्ये वास्तव्यास असताना त्यांच्यात मैत्री झाली. शीतल तिथे शूटिंगसाठी आली होती. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक साधली गेली आणि काही महिन्यांतच सुनीलने तिला लग्नासाठी मागणी घातली. पण नंतर तिला तो आधीच विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत अशी माहिती मिळाली. यामुळे शीतलने त्याच्या लग्नाची मागणी फेटाळली आणि ते हॉटेलही सोडून दिलं. पण तरीही सुनील तिला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत होता.
प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, तिची गळा कापून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हत्येचं कारण शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.
सध्या, सोनीपत पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे आणि पानिपत पोलिसांशी समन्वय साधत आहेत. पोलिस कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत आहेत आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि लोकेशन हिस्ट्रीच्या मदतीने शीतल शेवटच्या कोणाच्या संपर्कात होती हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
शीतल हरियाणवी संगीत उद्योगात सक्रिय असल्याने, पोलिस या उद्योगाशी संबंधित लोकांचीही चौकशी करू शकतात. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.