Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटक: कुमारस्वामींच्या शपथविधीला दिग्गजांच्या उपस्थितीत काँग्रेस, जेडीएसकडून शक्तिप्रदर्शन

शपथविधीला युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार 

कर्नाटक: कुमारस्वामींच्या शपथविधीला दिग्गजांच्या उपस्थितीत काँग्रेस, जेडीएसकडून शक्तिप्रदर्शन

बंगळुरू : कर्नाटकामध्ये आठवड्याभरात दुसरा शपथविधी सोहळा रंगणार आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर एच.डी. कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज (बुधवार, २३ मे) संध्याकाळी साडेचार वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल. कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला भाजप विरोधक एकवटणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून विरोधकांचं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. या शपथविधीला युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पंजाबचे  मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग,  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बसपा अध्यक्ष मायावती,  सपा अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, डीएमके नेते एम. के. स्टॅलिन उपस्थित राहणार आहेत..

काहींना अपेक्षीत मंत्रीपदं

दरम्यान, अपेक्षेप्रमाणे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि दलित नेते जी. परमेश्वर यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. कुमारस्वामी यांच्यासह जी. परमेश्वर यांचाही शपथविधी आजच पार पडणार आहे. विधानसभा सभापतीपदी काँग्रेसचे के. आर. रमेशकुमार यांची निवड करण्यात आलीय. जेडीएसला मुख्यमंत्रिपद आणि १२ मंत्रीपदं तर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद आणि २२ मंत्रिपदं आली आहेत. 

संभाव्य मंत्री आणि त्यांना मिळणारे खाते, ठळक मद्दे

अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री पदी  जी. परमेश्वर 
विधानसभा सभापती पदी काँग्रेसचे के. आर. ऱमेश कुमार
जे. डी. एस ला मुख्यमंत्री पद आणि १२ मंत्री पद 
काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद आणि २२ मंत्री पद... 
उद्या संध्याकाळी ४:३० ला  कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार..
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष आणि दलीत नेते जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..

कुमारस्वामींनी घेतले शृंगेरीमठाचे दर्शन

शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी चिकमंगळुरच्या शृंगेरी मठात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. एकीकडे जेडीएस-काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असताना भाजप मात्र निषेध आंदोलन करणार आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरुमध्ये काळे झेंडे घेऊन भाजप नेते आणि कार्यकर्ते जेडीएस-काँग्रेसविरोधात आंदोलन करतील.

Read More