Marathi News> भारत
Advertisement

'या' 4 बँकांनी एका दिवसात वाढवले व्याजदर; EMIची रक्कम वाढणार

देशातील 4 बँकांनी सोमवारी आपले व्याजदर वाढवले. एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करूर वैश्य बँकेने कर्जदरात वाढ केली आहे. हा दर वाढल्याने कर्जाचे व्याजदर वाढले

'या' 4 बँकांनी एका दिवसात वाढवले व्याजदर; EMIची रक्कम वाढणार

मुंबई : देशातील 4 बँकांनी सोमवारी आपले व्याजदर वाढवले. एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करूर वैश्य बँकेने कर्जदरात वाढ केली आहे. हा दर वाढल्याने कर्जाचे व्याजदर वाढले. निधीच्या किरकोळ किमतीवर आधारित रेपो दराच्या आधारे कर्जदरात वाढ करण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँकेने निधी आधारित कर्ज दर (MCLR) 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. प्रत्येक मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. HDFC बँकेचा कर्ज दर 7.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. नवे दर 7 मे पासून लागू झाले आहेत.

कॅनरा बँकेने सांगितले की त्यांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7 मे 2022 पासून 7.30 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. बँकेने MCLR आधारित कर्ज दर देखील बदलले आहेत. 

पुणेस्थित बँक ऑफ महाराष्ट्रनेही सर्व कालावधीसाठी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सांगितले की, MCLR चे नवीन दर 7 मे पासून लागू होणार आहेत. एक वर्षाचा MCLR 7.25 टक्क्यांवरून 7.40 टक्के करण्यात आला आहे. 

रेपो दरवाढीचा परिणाम

खाजगी क्षेत्रातील बँक करूर वैश्य बँकेने सांगितले की त्यांनी बँकेचा एक्सटर्नल बेंचमार्क रेट रेपो लिंक्ड (EBR-R) 7.15 टक्क्यांवरून 7.45 टक्क्यांवर 9 मे 2022 पासून बदलला आहे. गेल्या आठवड्यात, आरबीआयने रेपो दर 0.40 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. 

रेपो रेटशी जोडलेल्या कर्जदरात वाढ झाल्याने वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जे यांसारखी ग्राहक कर्जे महाग होतात. 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना व्याजदर रेपो दराशी जोडण्यास सांगितले होते. यामध्ये सर्व प्रकारच्या फ्लोटिंग रेट वैयक्तिक कर्जे आणि किरकोळ कर्जांचा समावेश आहे. 

Read More