गुरुग्राममध्ये वडिलांनी गोळ्या घालून टेनिसपटू राधिका यादवची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असून, आरोपी वडिलांकडून वेगवेगळे दावे केला जात आहेत. यादरम्यान तिची चांगली मैत्रीण असल्याचा दावा करणारी हिमांशिका सिंग राजपूतने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत अनेक दावे केले आहेत. 25 वर्षीय राधिका हत्या होण्यापूर्वी तिच्या पालकांच्या मागण्यांपुढे झुकण्यास तयार होती असा दावा तिने केला आहे.
"राधिका माझी खूप चांगली मैत्रीण होती. दोन दिवसांपूर्वीच, मी तिच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उभी राहून अकल्पनीय गोष्टींना तोंड देण्याचा प्रयत्न करत होते. ती आता येथे नाही,. तिचा जीव तिच्याकडून अत्यंत क्रूर आणि हृदयद्रावक पद्धतीने हिरावून घेण्यात आला. एक माणूस जो तिचे रक्षण करणार होता त्याच वडिलांनी तिची हत्या केली. हा रागातील क्षण नव्हत, तो पूर्वनियोजित होता. तिचे वडील काही दिवसांपासून तिला मारण्याचा कट रचत होते," असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
हिमांशिकाने असाही दावा केली आहे की, वडिलांनी हत्या करण्याच्या 10 दिवस आधी राधिका यादव तिच्या आयुष्यातील परिस्थितीमुळे आणि तिच्या पालकांचा सतत अपमान होत असल्याने खूप दुःखी झाली होती. "गेल्या 10 दिवसांत तिचं आयुष्य खूप दुःखी झालं होतं. तिने अखेर हार मानली. तिने त्यांना सांगितलं की ती त्यांच्या निर्बंधांना बळी पडण्यास तयार आहे. पण बहुतेक तिच्या वडिलांनी सद्बुद्धी गमावली होती. यावरुनच तो माणूस मानसिकदृष्ट्या त्रस्त होता हे स्पष्ट होत आहे," असं ती व्हिडिओमध्ये म्हणाली.
हिमांशिकाने राधिकाचे वडील दीपक यादव मानसिक आरोग्याशी संबंधि समस्यांशी झुंजत होते असं म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी त्यांनी जे केलं आहे त्याचं समर्थन करता येत नाही असंही सांगितलं आहे. "त्याच्या आजुबाजूच्या लोकांनी किंवा त्यांच्या मित्रांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे त्यांना लाज वाटू लागली होती. ते राधिकाच्या कामाबद्दल, मेकअपबद्दल आणि कपड्यांबद्दल त्यांना टोमणे मारत होते. कोणता बाप स्वतःच्या मुलीवर पाच गोळ्या झाडू शकतो? पुरुषांच्या अहंकारामुळे मुली किती काळ मारल्या जातील?," अशी विचारणा तिने केली आहे.
हत्येच्या काही दिवस आधीच त्याची योजना आखली गेली होती असाही हिमांशिकाचा दावा आहे. दीपक यादवने हत्या करताना कुटुंबातील इतर सदस्यांना दूर ठेवण्याची योजना आखली होती असाही तिचा दावा आहे. "त्याने तिच्या आईला दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवलं आणि तिच्या भावाला घराबाहेर काढण्याचं नाटक करून घराबाहेर काढलं. राधिकाकडे एक पाळीव कुत्रा जो तिला वाचवण्याचा प्रयत्न करू शकला असता, म्हणून त्याला घराबाहेर काढण्यात आलं," असं ती म्हणाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यादवने हत्येची कबुली दिली आहे. मुलीच्या कमाईवर जगत असल्याने गावकऱ्यांनी मारलेले टोमणे आणि टिप्पण्यांमुळे त्याचा अभिमान दुखावला गेला होता, म्हणून त्याने मुलीवर गोळी झाडून तिची हत्या केली.