Amit Shah Parliament Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आज संसदेमध्ये पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील सविस्तर माहिती दिली. यावेळेस अमित शाहांनी भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'मध्ये मारले गेलेले तिन्ही दहशतवादी हे पहलगाम हल्ल्यात सहभागी होते, असं सांगितलं आहे. भारतीय नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणं हीच केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचं अमित शाहांनी सांगितलं. “सामान्य नागरिकांवर दहशत पसरवणाऱ्यांना सोडणार नाही”, असंही केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
सशस्त्र दलांना कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, असंही अमित शाह म्हणाले. पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करणारे तिन्ही दहशतवादी मारले गेल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये सांगितले. अमित शाहांनी, "बैसरन खोऱ्यात आमच्या 26 लोकांना मारणारे ते तीन दहशतवादी मारले गेले आहेत," असं सांगितलं.
"22 मे रोजी आयबीला दाचिगाम परिसरात दहशतवादी असल्याचा माहिती मानवी गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून मिळाली. या माहितीची पुष्टी करण्यासाठी मे ते 22 जुलैपर्यंत सतत प्रयत्न केले गेले. उंचावर काही सिग्नल मिळवण्यासाठी लष्कराचे जवान इकडे तिकडे फिरत राहिले. 22 जुलै रोजी सेन्सर्सद्वारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी झाली. पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आणि कारवाईला सुरुवात केली," अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी 'ऑपरेशन महादेव'बद्दल बोलताना दिली.
नक्की वाचा >> इंदिरा गांधींमुळे POK पाकिस्तानकडे, अक्साई चीन नेहरुंमुळे..; संसदेत शाहांचे आक्रमक भाषण
"जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्तरित्या ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडून तीन रायफल जप्त करण्यात आल्या. सुलेमान, जिब्रान आणि अफझल हे दहशतवादी मारले गेले. पहलगाममध्ये ज्या रायफल्सने हल्ला करण्यात आला होता त्याही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून एम 9 अमेरिकन रायफल आणि दोन एके-47 जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या काडतुसांची शास्त्रज्ञांनी पहाटे 4 वाजून 46 मिनिटांनी पुष्टी केली आहे," असं अमित शाह म्हणाले.
"पहलगाम हल्ल्यामध्ये हेच दहशतवादी होते याची पुष्टी झाली आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींनीही त्याची ओळख पटवली आहे," असंही गृहमंत्री म्हणाले. मंगळवारी पहाटे 4 वाजता दहशतवाद्यांची पुष्टी झाल्याचे त्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन मदतनीसांनाही अटक करण्यात आली आहे, असं सांगतानाच या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला होता, अशी माहिती संसदेला दिली.