मिलिंद सागरे, झी 24 तास मुंबई : अहमदाबाद विमानतळावर झालेल्या बोईंग-787 विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. हा अपघात एव्हिएशन इंडस्ट्रीला मोठा धक्का मानला जात आहे. बोईंगचं ड्रिमलायनर हे विमान अत्याधुनिक विमानांपैकी एक आहे. शिवाय अपघातग्रस्त विमान अवघं बारा वर्ष जुनं होतं... एवढ्या चांगल्या विमानाचा अपघात झाल्यानं इतर ड्रिमलायनर विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.
दुर्घटनाग्रस्त विमानात तब्बल 1 लाख 25 हजार लिटर उच्चप्रतिचं इंधन भरलेलं होतं. विमानानं टेकऑफ करताच अवघ्या काही सेकंदात पायलटनं कंट्रोल रुमला मेडे मेडे हा धोक्याचा इशारा दिला होता. याचा अर्थ टेकऑफ घेतल्यानंतर विमानाची इंजिनं अचानक बंद झाल्याचं कॅप्टनच्या लक्षात आलं होतं. साधारणतः विमानाची दोन्ही इंजिनं एकाचवेळी बंद होत नाही. मग अचानक विमानाची दोन्ही इंजिनं बंद कशी झाली असा सवाल या निमित्तानं विचारला जात आहे.
अहमदाबाद विमानतळावरुन लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या विमानात वाढत्या तापमानामुळं बिघाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अहमदाबादचं गुरुवारी दुपारचं तापमान 43 ते 44 अंश सेल्सियस एवढं होतं... गेल्या काही वर्षांपासून विमानप्रवासी स्वतःसोबत घेऊन जाणा-या सामानाचं वजन कमी सांगत आहेत. शिवाय काही विमान कंपन्याही थोडं सामान जास्त भरलं तर काही होत नाही असं म्हणून नियमापेक्षा जास्त कार्गो लोड करतात... वाढलेलं बाह्य तापमान त्यातच विमानाचं भारमान म्हणजेच विमानाचं वजन जास्त झालं असावं..त्यामुळंच विमानाला उड्डाणानंतर थर्स्ट मिळाला नसावा असं जाणकार सांगत आहेत.
बोईंग ड्रिमलायनर विमानाच्या शेपटाकडील भागात दोन छोट्या पंख्यासारखे एलिव्हेटर्स असतात. विमानाची दिशा ठरवण्यासाठी हे महत्वपूर्ण काम करतात. हे एलिव्हेटर्स अचानक जाम झाल्यास विमानाला हवेत झेप घेता येत नाही. कदाचित हे एलिव्हेटर्स जाम झाल्यानं विमानाला हवेत उड्डाण घेता आलं नसावं असा अंदाज तज्ज्ञांना आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमागंचं नेमकं कारण येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मानवी चूक असल्यास पुढच्या काळात त्या चुका टाळल्या जातील. तांत्रिक दोष असल्यास बोईंग कंपनी त्यात सुधारणा करेल. पण या अपघातामागच्या नेमक्या कारणाचा शोध घेतल्याशिवाय हवाईप्रवास सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही.