ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई : हल्ली आपण ब-याच अंशी इंटरनेटवर अवलंबून आहोत. गुगल, टेलिग्राम, फेसबुक, ऍपलचे अकाऊंट्सची संख्या लक्षणीय आहे. सातत्यानं वाढतेय मात्र जितकं यानं जगणं सोपं झालंय तितकाच धोकाही वाढला आहे. कारण इतिहासातला सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. मोठ्या प्रमाणात डेटा चोरीला गेला आहे.
इतिहासातला सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. जगातल्या 16 अब्ज लोकांचे पासवर्ड आणि क्रेडिंशियल्स चोरीला गेलेत. गुगल, फेसबुक, टेलिग्राम इतकंच काय तर अॅपल अकाऊंटची माहिती सायबर हॅकर्संनी चोरलीय, अशी माहिती समोर आली आहे.
डार्क वेबवर 16 अब्जांहून अधिक क्रेडेन्शियल्स ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असं सायबर सुरक्षा संशोधकांच्या लक्षात आलंय. एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार, जर यावर वेळीच उपाय केला गेला नाही तर लोकांना फिशिंग अटॅक, आयडी चोरी आणि त्यांच्या खात्यांवरचं नियंत्रण गमावावं लागू शकतं, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
2025 च्या सुरुवातीला संशोधन केलं होतं. मोठ्या प्रमाणात पासवर्ड लीक होण्यासाठी अनेक इन्फोस्टेलर मालवेअर जबाबदार आहेत, असं यात सहभागी झालेल्या संशोधकांचं म्हणणं आहे. पासवर्ड चोरी होणं ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे येत्या काळात अनेक धोक्यांना सामोरं जावं लागू शकतं.. हाच धोका ओळखून आता गुगलनं त्यांच्या अब्जावधी वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट पासवर्ड तत्काळ बदलण्याचा आणि पासकी वापरण्याचा सल्ला दिला आहे.
– सर्वात महत्त्वाचं तत्काळ सर्व अकाऊंटचे पासवर्ड बदला
- सोपा नको, युनिक पासवर्ड ठेवा
– पासवर्ड बदलल्यानंतरही खात्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय वापरा
– तुमचं खातं सुरक्षित करण्यासाठी पासवर्डऐवजी पासकी वापरा
21 शतक उजाडताच इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. अलिकडच्या काळात गुगल, फेसबुक, टेलिग्राम आपल्या गरजेची बाब बनलं आहे. आपली अनेक अकाऊंट्स, त्यावरच्या खाजगी माहितीवर सायबर चोरट्यांचा डोळा असतो. त्यामुळे वापरकर्त्यांनी कायम दक्ष राहावं, आवश्यक त्या सर्व सुरक्षेचे पर्याय वापरावेत तरच येत्या काळातला मोठा धोका दूर ठेवता येईल.