हैदराबादमधील एका कंपनीच्या अकाउंट्स ऑफिसरला व्हॉट्सअपवर 'या खात्यावर 1.95 कोटी पाठवा' असा मेसेज आला. कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडून हा संदेश आला असल्याने त्यामध्ये संशयास्पद वाटण्यासारखं काहीही नव्हतं. एका नव्या प्रोजेक्टच्या अॅडव्हान्स पेमेंटसाठी ही रक्कम पाठवण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर 1.95 कोटी ट्रान्सफर करण्यात आले. पण तो पूर्णपणे कायदेशीर मेसेज नव्हता.
तो मेसेज अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवरून आला असल्याचं वाटत होतं. कारण त्यांचा फोटो डिस्प्ले सेक्शनमध्ये होता, पण प्रत्यक्षात तो एक फसवणूक करणारा मेसेज होता ज्याने त्या अधिकाऱ्याला जवळजवळ 2 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं.
सुदैवाने एमडी आणि त्याच्या कंपनीसाठी (आणि अकाउंट्स ऑफिसरसाठी), तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरोने ही 'हाय-व्हॅल्यू सायबर फसवणूक' थांबवली आणि संपूर्ण रक्कम वसूल केली.
दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. पैसे ट्रान्सफर करण्यात आल्यानंतर खऱ्या व्यवस्थापकीय संचालकांना बँकेकडून नोटिफेकेशन आलं. यामुळे त्यांची चिंता वाढली आणि त्यांनी तात्काळ अकाऊंट ऑफिसरशी संपर्क साधला. त्यांना व्हॉट्सअप मेसेजविषयी सांगण्यात आलं असता आपण असा कोणताही मेसेज पाठवला नसल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर त्यांनी तात्काळ नॅशनल सायबरक्राइम रिपोर्टिंग पोर्टलकडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर एनसीआरपीने कारवाई केली. सुरुवातीला काही तपशील गहाळ असल्याने ते कठीण होतं. तथापि, कंपनी, एमडी आणि बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत काम करून, अखेर पैसे नेमके कुठे आहेत हे सापडलं आणि चमत्कारिकरित्या संपूर्ण 1.95 कोटी रुपये परत मिळवले. सुदैवाने गुन्हेगारांनी अद्याप कोणतीही रोकड काढली नव्हती.
सायबर गुन्ह्याची ही पहिलीच घटना नाही. बनावट संदेश आणि कॉलद्वारे याआधीही अनेकांना गंडा घालून त्यांनी कष्टाने कमावलेले पैसे लुटण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात, हैदराबादमध्येही, काही मोबाइल अॅप्सद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्यांनी एका महिलेकडून 1 कोटी रुपये लुटले. या महिन्याच्या सुरुवातीला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आकांक्षा ठकराल हिने अॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्याच्या फोन कॉलला उत्तर दिल्यानंतर 1.1 लाख रुपये गमावले.