Marathi News> भारत
Advertisement

Hyderabad Encounter : ऍसिड हल्ल्यातील आरोपींचा एन्काऊंटर करणारेही सज्जनारच....

जवळपास ११ वर्षांपूर्वी घडलेली घटना 

Hyderabad Encounter : ऍसिड हल्ल्यातील आरोपींचा एन्काऊंटर करणारेही सज्जनारच....

हैदराबाद: काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहित बलात्कार आणि हत्येच्या चारही आरोपींचा शुक्रवारी एन्काऊंटर करण्यात आला. सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा एक चमू घटनास्थळी (जेथे बलात्कार झाला होता त्या ठिकाणी) पोहोचले होते. याचदरम्यान, घटना कशी घडली हे पाहताना आरोपींनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावून घेतली. ज्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला आणि यामध्ये चारही आरोपी मारले गेले अशी माहिती समोर येत आहे. 

सज्जनार यांच्य़ा नेतृत्वाखाली हे पोलीस पथक गेल्यामुळे आता त्यांच्याच नावाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशीच त्यांची प्रतिमा आहे. दैनिक भास्करने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार (V C Sajjanar) सज्जनार यांच्याच नेतृत्वाखाली एका कारवाईमध्ये ऍसिड हल्ल्यातील ३ आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता. ज्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी रिघ लावत असत. 

सज्जनार हे त्यावेळी म्हणजेच २००८ मध्ये, वारंगल येथील पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी आरोपी एस. श्रीनिवासने त्याच्या दोन साथीदारांच्या साथीनं अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्य़ा एका विद्यार्थीनीवर ऍसिड फेकलं होतं. प्रेम प्रस्ताव नाकारल्यामुळे त्याने असं केल्याचं सांगण्यात येतं. या घटनेनंतर सज्जनार यांच्याच निरिक्षणाअंतर्गत आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण, काही तासांनीच या आरोपींचा एन्काऊंटर झाला. 

'बलात्काऱ्यांना इतकी क्रूर शिक्षा करा की दहशत निर्माण झाली पाहिजे'

कायद्या आणि सुव्यवस्थेच्या मार्गावर चालत असतानाच सज्जनार यांचा हा एकंदर अंदाज आणि कामाच्या ठिकाणी असणारी त्यांची प्रतिमा, या साऱ्या गोष्टी पाहता ते अनेकांचं लक्ष वेधत होते. किंबहुना त्यांना त्या एन्काऊंटरच्या वेळी काही मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं. 

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणीसुद्धा सज्जनार हे प्रकाशझोतात आले खरे, पण यावेळीही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईवर नजरा रोखल्या आहेत. एकिकडे हे दृश्य असतानाच दुसरीकडे हैदराबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

Read More