Marathi News> भारत
Advertisement

अवघ्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण; सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या परिसरातील लोकांच्या वेगाने टेस्ट केल्या जातील. 

अवघ्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: देशभरात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ४९० रुग्ण आढल्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ४०६७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून निश्चित करण्यात आलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची अँटीबॉडी टेस्ट करण्यात येणार आहे.

त्यासाठी लवकरच भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला (ICMR) सात लाख अँटीबॉडी टेस्ट कीट उपलब्ध करून देण्यात येतील. यापैकी पहिल्या टप्प्यात ICMR ला पाच लाख किटस् मिळतील. त्यामुळे कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या परिसरातील लोकांच्या वेगाने टेस्ट केल्या जातील. 

'तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला नसता तर देशातील परिस्थिती वेगळी असती'

या परिसरातील नागरिकांच्या घसा आणि नाकातील द्रवाचे नमुने (स्वॅब) घेऊन या टेस्ट करण्यात येतील. जेणेकरून शरीरात कोरोनाच्या विषाणूंचा सामना करण्याची प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांची नेमकी संख्या लक्षात येईल. तर अँटीबॉडी टेस्ट नेगेटिव्ह आल्यास संबंधित नागरिकांना कोरोनापासून वाचण्यासाठी होम क्वारंटाईन करण्यात येईल.

केंद्र सरकारने आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १० हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. यामध्ये दिल्लीतील दिलशाद गार्डन, निझामुद्दीन परिसराचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. याशिवाय, नोएडा, मेरठ, भिलवाडा, अहमदाबाद, कासरगोडा आणि केरळमधील पतनमतिट्टा ही ठिकाणेही कोरोनाची हॉटस्पॉट आहेत.

अँटीबॉडी टेस्ट म्हणजे काय?
अँटीबॉडी हे एक Y आकाराचे प्रोटीन असते. मानवी शरीरातील B सेलकडून या प्रोटीनची निर्मिती केली जाते. या अँटीबॉडीजच्या सहाय्याने शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या विषाणू किंवा जिवाणुंचा शोध घेतला जातो. हे Y आकाराचे प्रोटीन बाहेरील जिवाणू आणि विषाणूंना प्रतिबंध करते. त्यामुळे शरीरातील बी सेलना विषाणू आणि जीवाणूचे नेमके स्वरुप लक्षात येते. यानंतर बी सेलकडून रोगाला अटकाव करण्यासाठी शरीरात अशाच अँटीबॉडीजची निर्मिती केली जाते. 

त्यामुळे एखाद्याच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अशाप्रकारच्या अँटीबॉडीज असतील तर संबंधित व्यक्ती कोरोनाची लागण झाली तरी त्यामधून बरा होईल. मात्र, शरीरात अशाप्रकारच्या अँटीबॉडीज नसतील तर त्याला कोरोनाचा जास्त धोका असू शकतो. त्यामुळे या व्यक्तींना कोरोनपासून वाचण्यासाठी होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जाईल.

Read More