Terrorist Operation In PoK: भारतीय लष्करानं दहशतवादी कारवायांना समूळ नष्ट करण्यासाठी म्हणून विडा उचलला आणि त्याचअंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक लष्करी कारवाई करत ऑपरेशन सिंदूर पार पाडलं. भारताच्या या कारवाईनं हादरलेल्या पाकिस्ताननं लगेचच थयथटायच करण्यासही सुरुवात केली आणि आता पुन्हा एकदा संपूर्ण जगापुढं आपली खरी बाजू लपवणाऱ्या याच पाकिस्तानात दहशतवादी कारवायांनी नव्यानं डोकं वर काढलं आहे. ज्यामुळं इतकी अद्दल घडवूनही पाकिस्तान काही सुधरण्याचं नाव घेत नाही, हेच आता पाहायला मिळतंय.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये (India Pakistan Tension) दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाले असून, प्रशिक्षण केंद्रांवर आणि लाँचपॅडवर हे दहशतवादी, कट्टरतावादी परतण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील सीमा सुरक्षा दल अर्थात BSF च्या इंस्पेक्टर जनरल (IG) शशांक आनंद यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती जारी केली. LoC आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून भारतात घुसखोरीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आल्याचं स्पष्ट करत या क्षणी भारतीय संरक्षण यंत्रणांना सतर्क राहण्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
दहशतवादी नेमकी भारतात कोणत्या दिवशी घुसखोरी करतील यासंबंधीच्या पक्क्या दिवसाची माहिती आपल्याकडे नाही. मात्र, सातत्यानं दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची माहिती मात्र गुप्तचर यंत्रणेकडून मिळत आहे. त्यांनी सीमेपलिकडे असणाऱ्या तळांवलर परतण्यास सुरूवात केल्याचं म्हणत भारतात शक्य त्या सर्व मार्गांनी घुसखोरीसाठीचं प्रशिक्षणही सुरू केल्याची माहिती बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, दहशतवादी तळांवर सुरू असणाऱ्या सर्व हालचालींवर सध्या भारतीय संरक्षण यंत्रणा लक्ष ठेवत असून, पाकिस्तानकडून होणारी एक लहानशी चूकसुद्धा त्यांना महागात पडू शकते असाच इशारा सध्या भारताकडून दिला जात आहे. त्यामुळं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हालचाली वाढल्यास पुन्हा एकदा सैन्याकडून कारवाई केली गेल्यास त्याच आश्चर्य वाटू नये. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा पाकिस्तानातील या कारवायांवर कटाक्ष टाकत तणाव निर्माण करणाऱ्य़ा या घटकांना थेटच इशारा दिला आहे. त्यामुळं आता भारत कोणत्याही अनुचित प्रकाराला सडेतोड उत्तर देत दहशतवादाला नायनाट करणार हे स्पष्ट होत आहे.