Marathi News> भारत
Advertisement

कोणत्याही क्षणी युद्ध? Ind-Pak तणावात रशियाचा कावेबाजपणा; शेजारी राष्ट्राला दिली घातक S-400 क्षेपणास्त्र

India Pakistan War : या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता आणि त्यांचा परिणाम पाहता ही चिंतेची बाब. भारतीय लष्कर कोणत्याही क्षणी तणाव वाढताच परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज   

कोणत्याही क्षणी युद्ध? Ind-Pak तणावात रशियाचा कावेबाजपणा; शेजारी राष्ट्राला दिली घातक S-400 क्षेपणास्त्र

India Pakistan War : जम्मू काश्मीरमधील (Pahalgam Terror Attck) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील नात्यामध्ये आणखी तेढ निर्माण झाली. खुद्द केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या मुद्द्यावर जातीनं लक्ष घालत महत्त्वाचे निर्णय घेण्याची मुभा देशातील लष्कराला दिली आणि परिस्थिती नेमकी किती गंभीर वळणावर पोहोचली आहे हेच स्पष्ट झालं. याच दोन देशांमधील तणाव वाढलेला असतानाच रशियानं संधी साधत कावेबाजपणा केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. 

रशियानं चीनला मदत करत वेधलं संपूर्ण जगाचं लक्ष

आश्यर्यकारक निर्णय घेत रशियानं अचानकच चीनला (Russia- China) अत्याधुनिक क्षमतेची एस 400 ही हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र सुपूर्द केली. स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार रशियाकडून चीनला ही क्षेपणास्त्र देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्यात आलं आहे. एस-400 ट्रायम्फ ही हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या यादीत जगातील सर्वाधिक कार्यक्षम आणि घातक अस्त्र असल्याचं म्हटलं जातं. या क्षेपणास्त्राची एकंदर निर्माणशैली विविध प्रकारचे हवाई हल्ले परतवून लावण्यास कमाल मदत करते आणि सकारात्मक परिणामही देते. एकिकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानशी सलगी असणाऱ्या चीनची ताकद रशियाकडून अशा पद्धतीनं वाढवली जाणं काही चिंताजनक मुद्द्यांना डोकं वर काढण्याचा वाव देत आहे. 

हेसुद्धा वाचा : पाकिस्तानवरील हल्ल्याची तयारी पूर्ण? उच्च स्तरीय बैठकीत मोदी म्हणाले, 'हल्ला कधी व कुठे करायचा हे...'

2014 मध्येच झाला होता यासाठीचा व्यवहार? 

उपलब्ध माहितीनुसार 2014 मध्येच चीनकडून अनेक एस 400 ट्रायम्फ ही क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी रशियासोबत अब्जावधींचा व्यवहार करण्यात आला होता. त्यासाठीच्या करारांवर स्वाक्षरीसुद्धा झाली होती.ज्यानंतर आता 11 वर्षानंतर त्याच करारासंदर्भातील रंजक माहिती समोर आली, जिथं रशियाकडून चीनला ही क्षेपणास्त्र देण्यात आली आहेत. रशियाच्या या कृतीमुळं आता चीनसोबत असणारे या देशाचे संबंध आणखी दृढ होणार हे निश्चित असून, यानिमित्तानं चीन राष्ट्रीय वायुदलाची ताकद वाढवण्यात एक पाऊस पुढे गेल्याचं स्पष्ट होत आहे. 

देशाच्या संरक्षणार्थ तैनात यंत्रणेसाठी कोट्यवधींचे करार

रशियानं चीनला ही एअर डिफेंस सिस्टीम अशा परिस्थितीमध्ये देऊ केली आहे जेव्हा भारत आणि फ्रान्सनं भारतीय नौदलासाठी साधारण 64 हजार कोटी रुपयांच्या भारतीय नौदलातील आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजावर राफेल ही लढाऊ विमानं तैनात करण्यासाठीच्या सहकारी करारावर स्वाक्षरी केली. एकिकडे सागरी क्षेत्रामध्ये जिथं चीन आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नांत असतानाच इथं भारतानंही त्या दृष्टीतून पावलं उचलल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान चीनमधील माध्यमांमध्ये यासंदर्भातील वृत्ताची चर्चा नसली तरीही हे राष्ट्र हवाई आणि सागरी सुरक्षिततेच्या गरजांसाठी रशियावर बहुतांशी अवलंबून असल्याची बाब मात्र नाकारता येत नाही. 

 

 

Read More