BSF Constable Return From Pakistan: भारत-पाकिस्तानची अंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडून गेलेले भारतीय सुरक्षा दलाचे कॉन्स्टेबल पुरनम कुमार शॉ यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवलं आहे. 23 एप्रिल रोजी पुरनम कुमार हे गस्त घालत असतानाच अंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या सीमेत गेले होते. तब्बल 20 दिवसानंतर पाकिस्तानने पीके सिंग यांना भारताकडे परत सोपवलं आहे. सकाळी साडेदहा वाजता पुरनम कुमार यांना भारताच्या ताब्यात सोपवण्यात आलं आणि त्यासंदर्भातील कागदोपत्री पूर्तता पूर्ण करण्यात आल्या. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच हा प्रकार घडला होता. मागील 20 दिववसांमध्ये दोन्ही देशातील संबंध या दहशतवादी हल्ल्यामुळे कमालीचे ताणले गेले असतानाच पाकिस्तानने पी. के. सिंग यांना मायदेशी परत पाठवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 23 एप्रिल रोजी फिरोजपूर येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पुरनम कुमार गस्त घालत होते. आहे. बीएसएफच्या गणवेशात असलेले कॉन्स्टेबल पी.के. सिंग अंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले. कॉन्स्टेबल पी.के. सिंग हे पाकिस्तानच्या सीमेत शिरले तेव्हा त्यांच्या हातात सर्व्हिस रायफल होती. 82 व्या बटालियनमध्ये कॉन्स्टेबल असलेले पीके सिंग हे एका स्थानिक शेतकऱ्यांबरोबर सावली शोधत असताना चुकून सीमेच्या पलीकडे गेले होते. पाकिस्तानच्या बाजूने सीमारेषेजवळ गवताच्या कुरणावर काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर पी. के. सिंग लक्ष ठेऊन होते. त्यावेळी ते चुकून पाकिस्तानच्या सीमा भागात गेले.
भारत-पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या झीरो लाइनजवळ शेतकऱ्यांना विशेष परवानगी घेऊन शेती करण्याची परवानगी दिली जाते. मात्र अशावेळी या शेतकऱ्यांबरोबर बीएसएफचे जवान असतात. या सैनिकांना किसान गार्ड असंही म्हणतात. झिरो लाइनच्या काही अंतर आधी तारा लावलेल्या असतात. मात्र पाकिस्तानने त्यांच्या बाजूने असलेल्या झिरो लाइनवर तारा लावलेल्या नसल्याने पुरनम कुमार चुकून ही सीमारेषा ओलांडून पलीकडे गेले होते. नो मॅन्स लॅण्ड म्हणजेच दोन्हीकडील कोणत्याही अधिकारी किंवा सैनिकांना प्रवेशाची परवानगी नसलेल्या भागात गेलेल्या पी. के. सिंग यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतलं होतं. पुरनम कुमार यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने बंधकाप्रमाणे ठेवल्याचे फोटो समोर आले होते.
पुरनम कुमार यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमा दलांमध्ये हा प्रकार घडल्यानंतरच्या दिवसापासूनच संवाद सुरु होता. अशाप्रकारे एखाद्या सैनिकाने चुकून सीमा ओलांडून जाणं ही सामान्य बाब आहे. यापूर्वीही दोन्ही बाजूने असं घडलं असून अनेकदा अशा सैनिकांना मायदेशी परत पाठवलं जातं, असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं होतं. मात्र आता पहलगाम प्रकरणानंतर दोन्ही देशांमधील संबंध तापलेले असल्याने पीके सिंग यांची सुटका कधी होते याबाबत साशंकता होती. मात्र या जवानाला पुन्हा भारताच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बीएसएफने पत्रक जारी करुन दिली आहे. वाघा-अटारी सीमेरेषेवर पुरनम कुमार यांना भारताकडे सोपवण्यात आल्याचं बीएसएफने पत्रकात म्हटलं आहे.
Today at 1030 hrs Constable Purnam Kumar Shaw has been taken back from Pakistan by BSF at Attari - Wagha border. Constable Purnam Kumar Shaw had inadvertently crossed over to Pakistan territory, while on operational duty in area of Ferozepur sector on 23rd April 2025 around 1150… pic.twitter.com/0S1KVrfOSL
— ANI (@ANI) May 14, 2025
भारत पाकिस्तान संबंध कामलीचे ताणले गेलेले असतानाही भारतीय अधिकाऱ्यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं असून पुरनम कुमार सुखरुपपणे परत आले आहेत.