India Pakistan Ceasefire: भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर झाल्यानंतर पाकिस्तानची नाचक्की झाली आणि शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला. भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने खोटे आरोप करत मोहीमच चालवली होती. शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत कमोडोर रघु आर नायर, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानने चालवलेल्या खोट्या मोहिमेची पोलखोल केली.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी यावेळी सांगितलं की, "पाकिस्तानने दावा केला होता की त्यांनी त्यांच्या JF 17 ने आमच्या S400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राचं नुकसान केलं जो पूर्णपणे चुकीचा आहे. दुसरे म्हणजे, त्यांनी सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नालिया आणि भूज येथील आमच्या हवाई तळांचं नुकसान केल्याचीही चुकीची माहिती देत मोहीम चालवली. तिसरं म्हणजे, पाकिस्तानच्या या खोट्या माहितीच्या मोहिमेनुसार, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारूगोळा डेपोचे नुकसान झाले, जे देखील खोटं आणि चुकीचं आहे. भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा पाकिस्तानने खोटा आरोप केला. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आमचे सैन्य भारताच्या संवैधानिक मूल्याचे एक अतिशय सुंदर प्रतिबिंब आहे हे मला स्पष्ट करायचं आहे".
"आमचे ऑपरेशन्स केवळ भारतविरोधी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या दहशतवादी छावण्या आणि सुविधांना लक्ष्य करण्यासाठी होत्या. भारतीय सशस्त्र दलांनी कोणत्याही धार्मिक स्थळांना लक्ष्य केलेलं नाही," असं यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी स्पष्ट केलं.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी म्हटलं की, "गेल्या काही दिवसांत आमच्या ठिकाणांवर विनाकारण हल्ला केल्यानंतर पाकिस्तानला खूप मोठं आणि अस्थिर नुकसान सहन करावं लागले आहे. जमीन आणि हवेत दोन्ही ठिकाणी त्यांचं नुकसान झालं आहे. स्कार्दू, जेकबाबाद आणि भोलारी या महत्त्वाच्या पाकिस्तानी हवाई तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याव्यतिरिक्त, AD शस्त्र प्रणाली आणि रडारचे नुकसान झाल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण कऱणं त्यांनी अशक्य झालं आहे. नियंत्रण रेषेपलीकडे लष्करी पायाभूत सुविधा, कमांड कंट्रोल सेंटर आणि लॉजिस्टिक ठिकाणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्याव्यतिरिक्त, दोन लष्करी कर्मचाऱ्यांमुळे त्यांची बचावात्मक आणि आक्रमक क्षमता आणि पाकिस्तानी मनोबल पूर्णपणे ढासळलं आहे."
कमोडोर रघु आर नायर यांनी शेवटी स्पष्ट केलं आहे की, "आम्ही भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल सामंजस्य कराराचे पालन करत असताना, आम्ही मातृभूमीच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आणि सतर्क आणि वचनबद्ध आहोत. पाकिस्तानच्या प्रत्येक चुकीच्या कृतीला ताकदीने तोंड दिलं आहे. भविष्यातील प्रत्येक हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल. राष्ट्राच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही ऑपरेशन्ससाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत."