India Pakistan War : 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. भारताने 7 मे 2025 रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत याला प्रत्युत्तर दिले, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं प्रतिहल्ला केला आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात मॉकड्रिल घेण्यात आले. नागरिकांना आकाशात विमान घिरट्या घालताना दिसल्यास मोबाईलच्या माध्यमातून हे विमान भारताचे आहे की पाकिस्तानचे हे जाणून घेता येवू शकते.
भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक बनावट संदेश व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये भीती पसरत आहे. अशा परिस्थितीत सतर्क राहणे गरजेचे आहे.
तुम्हाला घरावरून विमान उडताना दिसले तर हे विमान ते शत्रूचे आहे की आपले जाणून घेण्याची सोपी मोबाईल ट्रिक जाणून घेऊया. याच्या मदतीने घर बसल्या तुमच्या परिसरात उडणारे विमान कुठून आले आहे आणि कुठे जात आहे हे जाणून घेऊ शकता.
Flightradar24.com या पोर्टलवर आकाशात घिरट्या घालणाऱ्या सर्व विमानांची माहिती मिळू शकते. या पोर्टलवर जगभरातील विमानांबद्दल रिअल-टाइम माहिती उपलब्ध होते. या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या ठिकाणावरून उडणाऱ्या विमानांची माहिती तपासू शकता. हे पोर्टल प्रामुख्याने व्यावसायिक उड्डाणांचा डेटा उपलब्ध करुन देते. यात लष्करी जहाजांची माहिती असू शकत नाही. मात्र, सभोवतालच्या हवाई हालचाली समजून घेण्यासाठी हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे.
Flightradar24.com या पोर्टलवर विमानांची माहिती मिळवणे अतिशय सोपे आहे. मोबाईल किंवा लॅपटॉपवर वेबसाइट ओपन करा. या वेबसाइटवर पिवळ्या चिन्हांसह एक नकाशा दिसेल. हे चिन्ह जगभर उडणाऱ्या विमानांचे प्रतिनिधित्व करतात. हे पोर्टल ADS-B ट्रान्सपॉन्डर तंत्रज्ञानाचा वापर करते, जे विमानांकडून त्यांचे स्थान, उंची आणि मार्ग याबद्दल माहिती उपलब्ध होते. लष्करी जहाजे अनेकदा हे तंत्रज्ञान बंद ठेवतात, त्यामुळे त्यांची माहिती येथे दिसत नाही.
विमानाच्या पिवळ्या चिन्हावर क्लिक करा येथे क्लिक करताच त्या फ्लाइटची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. यामध्ये विमानाचे नाव, क्रमांक, ते कुठून उड्डाण करत आहे, कुठे जात आहे, त्याची उंची आणि वेग यासारखी माहिती उपलब्ध होते. उदाहरणार्थ, जर इंडिगो किंवा स्पाइसजेटची फ्लाइट असेल तर तिचे नाव स्पष्टपणे दिसेल. यावरून तुम्हाला सहज समजेल की हे एक व्यावसायिक विमान आहे. लष्करी विमाने अनेकदा त्यांचे ट्रान्सपॉन्डर बंद ठेवतात जेणेकरून त्यांचे स्थान ट्रॅक केले जाऊ नये. अशा स्थितीत जर नकाशावर कोणतेही जहाज दिसत नसेल तर ते लष्कराचे असू शकते. भारतीय सुरक्षा एजन्सीने हवाई हल्ल्यांचा इशारा दिला आहे.