ISI Spy Arrested from Jaisalmer: भारत आणि पाकिस्तानमध्ये असणारा तणाव वाढत असतानाच आता देशभरात संरक्षण यंत्रणांनी अनेक हालचालींवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान भारतीय संरक्षण यंत्रणांन एका पाकिस्तानी हेराबाबत माहिती मिळाली आणि गुप्तचर यंत्रणेनं राजस्थानातून आयएसआयला भारतीय सीमाभागातील गोपनीय माहिती देणाऱ्या पाकिस्तानच्या हेराला अटक केली.
पठान खान असं अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी हेराचं नाव असून, राजस्थानच्या जैसलमेर इथून त्याच्यावर यंत्रणेनं ही कारवाई केली. जवळपास महिन्याभरापूर्वीच खान याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर ऑफिशियल सीक्रेट एक्ट, 1923 च्या अन्वये वविध कलमांअंतर्गत खटला दाखल करण्यता आला. 1 मे रोजी त्याच्यावर अधिकृतपणे अटकेची कारवाई करत भारताकडून पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या हेतूनं मोठं पाऊल उचलण्यात आलं.
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पठान खान 2013 मध्ये पाकिस्तानाच गेला होता. जिथं तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात आला आणि तिथं त्याला पैशांचं आमिष दाखवत हेरगिरीचं प्रशिक्षण देण्यात आलं. खानवर असणाऱ्या आरोपांनुसार 2013 पासूनच तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांना भेटत होता. त्यानं या भेटींदरम्यान जैसलमेर येथील आंतरराष्ट्रीय सीमाभागाशी संबंधिक संवेदनशील आणि गोपनीय माहिती सातत्यानं पाकस्तानी हँडलर्सना दिली.
सदरील कारवाईसंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार आरोपी पठान खान हा मुळचा जैसलमेरचा रहिवासी असून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. इथं राज्य विशेष शाखेला पठानच्या हालचालींवर संशय होताच त्याच्यावर यंत्रणांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि यातूनच पुढे त्याला अटकही करण्यात आली.
पठान खाननं ज्या भागांची माहिती पाकिस्तानचा दिली आहे, यामध्ये भारतीय लष्कराचं येणं-जाणं असणाऱ्या क्षेत्रासमवेत इतरही संवेदनशील भागांचा समावेश होता. देशाची सीमा असल्या कारणानं इथं सातत्यानं लष्करी गस्तही पाहायला मिळते. याशिवाय सैन्यदलाचे अनेक प्रशिक्षणात्मक उपक्रमही इथं राबवण्यात येतात.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार पठान खान हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहाय्यानं पाकिस्तानमध्ये ही माहिती पोहोचवत होता. यामध्ये भारतीय लष्कराची कारवाई, फोटो आणि व्हिडीओंसह इतर संवेदनशील माहितीचा समावेश आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर विविध केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याची चौकशी केली असून, आरोपांची निश्चिती झाल्यानंतर त्याच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला.