India Pakistan War News in Marathi: भारताकडून करण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर आता पाकिस्ताननंही बुधवारी रात्रीच्या सुमारास भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, पाकचे हे नापाक मनसुबे भारतानं उधळून लावले आणि यामध्ये मोठी भूमिका बजावली ती म्हणजे भारतीय वायुदलाच्या वतीनं तैनात करण्यात आलेल्या S-400 या वायूसंरक्षण प्रणालीची अर्थात एअर डिफेन्स सिस्टीमची.
7 मे 2025 ला रात्री, पाकिस्ताननं भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताकडून हे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले.
पाकिस्तानकडून सोडण्यात आलेली क्षेपणास्त्र S-400 च्या मदतीनं जमीनदोस्त करत भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेचा कणा मोडला. S-400 ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम प्रामुख्यानं चीन आणि पाकिस्तानला केंद्रस्थानी ठेवत तयार करण्यात आली असून, या प्रणालीची रेंज 40 ते 400 किमी इतकी सांगण्यात येत आहे.
ऑक्टोबर 2018 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर असतानाच भारतासह रशियाचा S-400 संबंधित करार झाला. सध्याच्या घडीला ही वायू संरक्षण प्रणाली जगभरातील सर्वात शक्तिशाली संरक्षण क्षमता असणारी प्रणाली म्हणून अनेक शत्रू राष्ट्रांना धडकी भरवत आहे.
S-400 संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र ही शत्रू राष्ट्रासाठी अतिशय घातक असून, यांची जागा निर्धारित नसते. ज्यामुळं शत्रूंना सहजासहजी ती हेरता येत नाही. यामध्ये लावण्यात आलेली रडार सिस्टीम अतिशय अॅडवान्स असून S-400 क्षेपणास्त्रांच्या मदतीनं 400 किमीच्या अंतरापर्यंत अचूक लक्ष्यभेद करता येतो. या प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी शत्रूचा खात्मा करण्यासाठी 72 क्षेपणास्त्र सोडता येतात. इतकंच नव्हे, तर ही प्रणाली -50 अंश ते 70 अंशापर्यंतसुद्धा सक्षमरित्या काम करते.
भारतीय वायुदलातील अतिशय सक्षम प्रणाली म्हणून एस 400 कडे पाहिलं जातं. कारण, यामध्ये इतकी जबरदस्त क्षमता आहे की शत्रू पक्षाचं लढाऊ विमानही या प्रणालीपुढे नगण्य आहे. याच एस 400 नं पाकरिस्तानच्या मिसाईलना हाणून पाडत शेजारी राष्ट्राला दणका दिला आहे.