Marathi News> भारत
Advertisement

2024 निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, 'या' प्रमुख पक्षाने NDA तून बाहेर पडण्याची केली घोषणा

Loksabha Election 2024 :  पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एनडीतल्या प्रमुख पक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. तसा प्रस्तावच पक्षाने पारित केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

2024 निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, 'या' प्रमुख पक्षाने NDA तून बाहेर पडण्याची केली घोषणा

NDA Alliance: दक्षिण भारतात भारतीय जनात पार्टीला मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम अर्थात AIADMK ने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएपासून (NDA) वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एआयएडीएमकेने याची घोषणा करत प्रस्ताव पारित केला आहे. यासंदर्भात  AIADMK ची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ता के पी मुनुसामी (K P Munusamy) यांनी भाजप आणि एनडीएशी सर्व संबंध तोडत असल्याची माहिती दिली. 

भाजपची साथ का सोडली?
AIADMK चे प्रवक्ते केपी मुनुसामी यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातली माहिती दिली. भाजपचे तामिळनाडूतले स्थानिक नेते गेल्या वर्षभरापासून सातत्याने आमचे नेते, महासचिव एडापड्डी पलानीस्वामी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप आणि टीका करत आहेत. तसंच भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष अन्नामलाई यांनी माजी मुख्यमंत्री जयललितांचाही अपमान केल्याचा आरोप AIADMK ने केलाय. भाजपच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्ते नाराज होते. अखेर पक्षाच्या बैठकीत सर्वांच्या सम्मतीने भाजप आणि एनडीएची साथ सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती के पी मुनुसामी यांनी दिली. 

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पक्ष एका वेगळ्या आघाडीचं नेतृत्व करेल अशी घोषणाही AIADMK ने केली आहे. तामिळनाडूमध्ये भाजपासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. 

गेल्या वर्षभरापासून नाराजी
गेल्या वर्षभरापासून भाजप आणि AIADMK मधले संबंध ताणले गेले होते. काही दिवसांपूर्वीच AIADMK नेते डी जयकुमार यांनी भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष के अन्नामलाई यांच्यावर हल्लाबोल केला होता. पक्षाच्या दिवंगत नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा डी जयकुमार यांनी दिला होता. अन्नामलाई यांनी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह AIADMK च्या काही नेत्यांवर टीका केली होती. 

राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार AIADMK कोणत्या आघाडीत सहभागी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. देशातील दोन असे प्रमुख पक्ष आहेत जे एनडीए किंवा इंडिया सहभागी झालेले नाहीत. यातला एक पक्ष म्हणजे तेलंगानाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन स्वतंत्र आहेत. 

Read More