Marathi News> भारत
Advertisement

एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानवर ठेवणार नजर; हवाई दलाला मिळाले हेरॉन मार्क-2 ड्रोन

Heron Mark-2 : भारतीय हवाई दलात आता हेरॉन मार्क-2 ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. हे ड्रोन एकाच उड्डाणात पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर पाळत ठेवू शकतात. लष्कराला एकूण 31 प्रीडेटर ड्रोन देखील मिळत आहेत, जे उच्च उंची, दीर्घ सहनशक्ती श्रेणीतील आहेत.

एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानवर ठेवणार नजर; हवाई दलाला मिळाले हेरॉन मार्क-2 ड्रोन

Indian Air Force : भारताने उत्तरेकडील क्षेत्रातील फॉरवर्ड एअरबेसवर प्रगत हेरॉन मार्क-2 ड्रोन (Heron Mark-2) तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. याशिवाय या ड्रोनद्वारे एकाच वेळी चीन-पाकिस्तान या दोन्ही सीमांवरही नजर ठेवली जाऊ शकते. त्यामुळे आता पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) या दोन्ही देशांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपले नवीनतम हेरॉन मार्क 2 ड्रोन तैनात केले आहेत. 

महत्त्वाची बाब म्हणजे हे ड्रोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि एकदा उड्डाण केल्यानंतर ते चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमांवर नजर ठेवू शकतात. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र शस्त्रास्त्र प्रणालीने सुसज्ज चार हेरॉन मार्क 2 ड्रोन उत्तरेकडील क्षेत्रातील फॉरवर्ड बेसवर तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बालाकोट सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे भारतीय सैन्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करण्याची गरज भासणार नाही. अमेरिकेने ज्या प्रकारे अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरी आणि जगातील इतर अनेक देशांना ड्रोन हल्ल्यात ठार केले होते त्याचप्रमाणे आता भारताकडेही ड्रोनची ताकद आली आहे. भारतीय हवाई दलालाही हेरॉन ड्रोन मार्क-2 असे गेम चेंजर अस्त्र मिळाले आहे. इस्रायलमधून घेतलेले हेरॉन ड्रोन अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत.

हेरॉन मार्क-2 ड्रोन इस्त्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने बनवले आहेत. या ड्रोनच्या मदतीने एकाच उड्डाणामध्ये अनेक मोहिमा राबवल्या जाऊ शकतात आणि एकाच वेळी अनेक क्षेत्रांवर लक्ष ठेवता येते. एक दिवसा आधीच भारतीय वायुसेनेने श्रीनगर एअरबेसवर प्रगत असे मिग-29 लढाऊ विमानांचा एक स्क्वॉड्रन तैनात केला आहे. उत्तर फॉरवर्ड सेक्टरमध्ये मिग-29 आणि हेरॉन मार्क-2 ड्रोन तैनात केल्यामुळे लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे.

कसे आहे हेरॉन मार्क-2 ड्रोन?

हे ड्रोन सॅटेलाईट कम्युनिकेशन क्षमतेने सुसज्ज आहेत. त्यामुळे ते बऱ्याच अंतरावरून ऑपरेट केले जाऊ शकतात. याशिवाय, ते लेझर तंत्रज्ञानाद्वारे शत्रूचे ठिकाण शोधू शकते. यामुळे लढाऊ विमाने लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करून त्यांची ठिकाणे उद्धवस्त करु शकतील. हे ड्रोन एकाच ठिकाणाहून संपूर्ण देशावर लक्ष ठेवू शकतात.

या ड्रोन स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर पंकज राणा म्हणाले की, हेरॉन मार्क-2 हे अतिशय सक्षम ड्रोन आहे. हे बराच काळ टिकण्यास सक्षम आहे आणि मोठ्या क्षेत्राचे निरीक्षण करू शकतात. आधुनिक एव्हीओनिक्स आणि इंजिनमुळे ड्रोनचा कार्यकाळ वाढला आहे. हे सॅटेलाईट कम्युनिकेशनसह सुसज्ज आहे आणि लक्ष्यावर 24 तास पाळत ठेवण्यास सक्षम आहे. हेरॉन मार्क-2 ड्रोन लढाऊ विमानांनाही मदत करतात.

Read More