Shubhanshu Shukla Axiom-4 Mission Latest Updates: भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणारी मोहीम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. AXIOM-4 ही मोहिम खराब हवामानामुळं एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) अधिकृत एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला व त्यांचे तीन सहकारी AXIOM-4 या यानातून अंतराळ मोहिमेवर जाणार होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळं आता ही मोहिम स्थगित करण्यात आली. हे यान आज संध्याकाळ 5.30 वाजता अवकाशात झेपावणार होते.
स्पेसएक्सकडून जारी करण्यात आलेल्या विधानानुसार, AX-4 मिशनच्या फॉल्कन 9 प्रक्षेपण वाहनाच्या तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या तांत्रिक बाबी दुरुस्त करून प्रक्षेपणाची नवीन तारीख घोषित केली जाईल. दरम्यान यानाच्या प्रक्षेपणासाठी हवामान 85 टक्के अनुकूल असल्याचे सांगण्यात आले होते. फॉल्कन 9 प्रक्षेपण वाहनाच्या चाचणीदरम्यान ऑक्सीजन लीक झाल्याची बाब समोर आली होती. वेळेत ही बाब लक्षात आल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. अन्यथा यानाचे मोठे नुकसान झाले असते.
हे अॅक्सिओम-4 मिशन अमेरिकन अंतराळ संस्था नासा, एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्स आणि इस्रो यांच्या संयुक्त मोहिमेच्या रूपात लाँच केले जाणार आहे. याआधी तीन प्रक्षेपणे देखील झाली आहेत. भारतासाठी हे ऐतिहासिक आहे कारण जवळजवळ 40 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळवीर अंतराळ मोहिमेवर जाणार आहे. लखनऊचे रहिवासी आणि हवाई दलाचे वैमानिक शुभांशू शुक्ला यांनी यासाठी एक वर्षाचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. अॅक्सिओम-4 मोहीम यापूर्वी दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे. 10 जून रोजी, प्रक्षेपण स्थळी वारा आणि मुसळधार पाऊस पडल्यामुळे ते रद्द करावे लागले होते.
अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत, 14 दिवसांसाठी अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे. याअंतर्गत, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि जीवन विज्ञानाशी संबंधित अनेक महत्त्वाचे संशोधन केले जाणार आहे. या मोहिमेशी सुमारे 30 देशांतील संशोधक जोडले गेले आहेत. हे अंतराळ अभियान भारतासाठी महत्त्वाचे आहे कारण भारत स्वतःच्या ताकदीवर अंतराळ मोहिम गगनयान तयारी करत आहे. गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या 4 अंतराळवीरांना भारत अवकाशात पाठवणार आहे. 2027 पर्यंत गगनयान प्रक्षेपित करण्याचे भारताचे लक्ष्य आहे.