Indian Government on US Tarrif: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25 टक्के कर लावल्याची घोषणा केल्यानंतर भारत सरकारने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेसह व्यापार चर्चा सुरु ठेवत शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सुरक्षेसाठी सरकार कठोर पावलं उचलेल असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. भारताने सांगितलं आहे की, "सरकार आपल्या शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमई यांच्या कल्याणाचे रक्षण आणि प्रोत्साहन देण्याला सर्वोच्च महत्त्व देते. सरकार आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल, जसे की यूकेसोबतच्या आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांच्या बाबतीत केले गेले आहे."
भारताने म्हटलं आहे की परदेशी खेळाडूंसाठी आपली बाजारपेठ उघडतानाच, देशांतर्गत खेळाडूंच्या हिताचे रक्षण करण्याबाबतही ते संवेदनशील आहेत. यासाठी भारताने ब्रिटनसोबतच्या अलिकडच्या मुक्त व्यापार कराराचा हवाला दिला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे कर जाहीर केल्याने भारतात चांगली कामगिरी कऱणाऱ्या अनेक निर्यात क्षेत्रांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाईल्स, ऑटो कंपोनेंट्स, स्टील, अॅल्युमिनियम, स्मार्टफोन्स, सोलर मॉड्यूल्स, सागरी उत्पादने, रत्ने आणि दागिने आणि निवडक प्रक्रिया केलेले अन्न आणि कृषी उत्पादने हे सर्व 25 टक्के करांच्या यादीत समाविष्ट आहेत. तथापि, औषधनिर्माण, सेमीकंडक्टर आणि महत्त्वपूर्ण खनिजे वगळण्यात आली आहेत.
दरम्यान, अर्थतज्ज्ञ भारताने इतर देशांशी सखोल आर्थिक संबंध निर्माण करण्याबद्दल, नवीन बाजारपेठांचा शोध घेण्याबद्दल आणि देशांतर्गत नवीन संधी शोधण्यावर जोर देत आहेत. ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे बदलत्या भू-राजकारणात जागतिक पुरवठा साखळ्यांचे पुनर्संतुलन झाल्यामुळे यामुळे सुधारणा होतील.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर 25 टक्के आयात शुल्क लागू करणार असल्याची घोषणा बुधवारी केली. तसंच रशियाकडूनो मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इंधन खरेदी करत असल्याबद्दल दंडदेखील होणार असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान दंड किती असेल हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरी, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यवसाय केला आहे. कारण त्यांचे आयातशुल्क खपू जास्त आणि जगात सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि वाईट गैर-मौद्रिक व्यापार अडथळे आहेत".
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "भारताने नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाने युक्रेनमध्ये होणारी हत्या थांबवावी असं वाटते. सर्व गोष्टी चांगल्या नाहीत. म्हणून भारत 1 ऑगस्टपासून 25 टक्के आयातशुल्क आणि वर दिलेल्या कारणांसाठी दंड भरेल. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद! अमेरिकेला पुन्हा महान बनवूयात".