Gold Investment: पूर्वी भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जातं. राजा-महाराजांपासून अनेक मोठ्या उद्योगपतींकडे सोन्याचा साठा असायचा. आजही भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी आहे. भारतात सोनं खरेदी करणे हे एक परंपरेचे लक्षण मानले जाते. पू्र्वीच्या काळात सोनं फक्त धन-संपत्ती नव्हे तर सत्तेचेदेखील प्रतीक मानले जायचे. आता काळ बदलला पण सोन्याची चमक काही कमी झाली नाही. त्याचे महत्त्व आधिकच वाढत गेले. आज भारतात सर्वाधीक सोनं कुठेय याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
जागतिक मंदी आणि आर्थिक अनिश्चितत्तेच्या काळात सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुक म्हणून पाहिले जाते. आज जगभरात सोनं म्हणजे फक्त दागिनेच नव्हे तर गुंतवणुकीचे एक साधनदेखील आहे.सेंट्रल बँक असो किंवा उद्योगपती असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येकाकडे सोनं कोणत्या ना कोणत्या रुपात असतेच.
फायनेंशियल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, सरकारी खजिन्यांचा विचार केल्यास अमेरिकेकडे सगळ्यात जास्त सोन्याचा साठा आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत अमेरिकेत ८,१३४ टन सोनं होतं. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडेच आहे. त्यानंतर जर्मनी, चीन आणि नंतर भारताचा नंबर येतो. भारताकडे ८७६ टन सोनं आहे. राष्ट्रीय रिझर्वमध्ये हा सोन्याचा साठा आहे. मात्र खरी आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेकडे सरकारी खजिन्यापेक्षा अधिक सोनं आहे.
भारतातील कुटंबाकडे जवळपास २४,००० टन सोनं असून जे संपूर्ण जगातील सेंट्रल बँकेच्या एकूण स्टॉकच्या बरोबर आहे. चीनचे नागरिक या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये २०,००० टन सोनं आहे.
भारतात सध्या सोन्याची किंमत ९५,२४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. लवकरच सोनं १ लाखांचा आकडा पार करु शकते. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ३,३३३ डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. मागील एक वर्षात सोन्याने ४० टक्क्यांचा परतावा दिला आहे.अशात तज्ज्ञांच्या सल्लानुसार, तुमच्या कमाईचा १० टक्के हिस्सा सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे. त्यामुळं यापुढं जर तुम्ही सोन्याची अंगठी किंवा शिक्का खरेदी करणे म्हणजे फक्त दागिना समजू नये तुमची आर्थिक सुरक्षा म्हणून त्याच्याकडे पाहा.