Indian Railway Rules : विमान प्रवास करत असताना अनेकदा एक ना अनेक नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. विमानानं प्रवास करण्याच्या वेळेआधी विमानतळावर पोहोचणं असो किंवा मग विमानातील प्रवासादरम्यान ठराविक वजनाचं सामान सोबत नेणं असो. प्रवास करत असताना या नियमांचं पालन करणं प्रवाशांसाठी अनिवार्य असतं. महत्त्वाची बाब म्हणजे आता फक्त विमानच नव्हे, तर रेल्वे प्रवासातही हे नियम लागू होणार आहेत.
थोडक्यात इथून पुढं रेल्वेनं प्रवास करत असतानाही इथं विमान प्रवासातील एक नियम लागू होणार आहे. हा नियम असेल रेल्वे प्रवासादरम्यान सोबत नेता येणाऱ्या सामानाच्या वजनाचा. लक्षात घ्या, रेल्वे प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाला सोबन सामान नेण्यासाठी एक ठराविक मर्यादा आखून दिली जाते. ठरलेल्या प्रमाणाहून जास्त सामान सोबत नेल्यास त्यासाठीचं वाढीव शुल्क प्रवाशांकडून आकारलं जातं. आता भारतीय रेल्वेनं या नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे.
2025 च्या एप्रिल महिन्यामध्ये पश्चिम रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्या आणि निर्धारित मर्यादेहून जास्त सामान सोबत नेणाऱ्या प्रवाशांकडून दंड स्वरुपात एकूण 21 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम वसूल केली. पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यआंनी यासंदर्भातील माहिती दिली. यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 6 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
रेल्वे विभागात काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाअंतर्गत ही कारवाई झाली असून, यामध्ये अनेक तिकीट तपासणी पथकांनी जवळपास 3.10 लाख विनातिकीट प्रवाशांना हेरत त्यांच्याकडून हा दंड वसूल केला. रेल्वे विभागाच्या वतीनं निर्धारित मर्यादेहून अधिक सामान नेणाऱ्या प्रवाशांवरही यंत्रणेनं चाप बसवत त्यांना या नियमाची माहिती करून दिली. यामध्येही जवळपास 6000 प्रवाशांकडून रेल्वेनं 20.24 लाख रुपये इतकी मोठी रक्कम दंडाच्या माध्यमातून वसूल केली. थोडक्यात रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी सोबत नेमकं किती सामान न्यावं यासंबंधीच्या नियमाचं पालन केलं जात आहे की नाही, यावर आता यंत्रणा लक्ष ठेवत असून, प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.