Indian Railway Chance To Win 5 Lakh: जगातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. अनेक देशांची लोकसंख्याही नाही एवढे प्रवासी रोज भारतीय रेल्वेने प्रवास करतात. देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या नजरेत रोज झळकणाऱ्या रेल्वे स्थानकांवरील डिजिटल घड्याळांना आता नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. भारतीय रेल्वेने सर्व स्थानकांवरील घड्याळांचे डिझाईन एकसंध आणि आधुनिक करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी देशपातळीवर एक विशेष डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून निवडल्या जाणाऱ्या उत्कृष्ट डिझाईनसाठी तब्बल 5 लाख रुपयांचे प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे. रेल्वेच्या या उपक्रमामुळे नवकल्पना, सर्जनशीलता आणि डिजिटलीकरणाला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी ही एक मोठी संधी रेल्वेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्व स्टेशनांवरील डिजिटल घड्याळांचा मानक नमुना तयार करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. यात व्यावसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी या तीन स्वतंत्र गटांमध्ये सहभाग घेता येणार आहे. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती व प्रचार) दिलीप कुमार यांनी या स्पर्धेसंदर्भातील माहिती दिली. एकाच स्पर्धकाला अनेक डिझाईन्स पाठवण्याची मुभा आहे. नवीन कल्पनांना प्रोत्साहन आणि डिजिटल इंडिया अभियानाला हातभार लावणारा हा उपक्रम असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे असं आव्हान कुमार यांनी केलं आहे.
डिझाईन हाय रिझोल्यूशनमध्ये असावी, त्यावर कोणताही वॉटरमार्क किंवा लोगो नसावा. डिझाईनसोबत त्यामागील संकल्पना स्पष्ट करणारा संक्षिप्त लेख सादर करावा लागेल. डिझाईन पूर्णतः मौलिक असावी आणि ती बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करणारी नसावी, याचीही दक्षता स्पर्धकांना घ्यावी लागणार आहे.
प्रथम बक्षीस - एकूण तीन गटांतील उत्कृष्ट डिझाईनला प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जाणार आहेत.
सांत्वन बक्षीस - प्रत्येक गटात 5 स्पर्धकांना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
डिझाईन सादरीकरणाची मुदत 1 मे ते 31 मे 2025 दरम्यान आहे.
सादरीकरणाचे माध्यम केवळ ऑनलाईन/ई-मेल असावे.