Indian Railway News : भारतात दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवासी रेल्वेमार्गानं प्रवास करत अपेक्षित ठिकाणी पोहोचतात. देशातील बहुतांश भागांना जोडणाऱ्या या भारतीय रेल्वेनं आतापर्यंत प्रत्येक उत्पन्नगटासाठी रेल्वेसेवा पुरवत लांब पल्ल्यांचे प्रवासही सर केले. अर्थात यात काही त्रुटीसुद्धा आढळून आल्या. मात्र त्यावर आपण निश्चितपणे काम करत असल्याची हमी देत रेल्वे विभागानं प्रवाशांना दिलासा दिला.
आता नुकताच एका सोशल मीडिया व्हिडीओमुळं या हमीपात्र शब्दांचं नेमकं काय झालं हाच प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे एका व्लॉगरनं दाखवलेलं भारतीय रेल्वेचं खरं रुप. Travel Vlogger उज्ज्वल सिंग यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये त्यानं आपण प्रवास करत असणाऱ्या रेल्वेची दुर्दशा आणि अस्वच्छता पाहून नाराजीचा सूर आळवला. मुख्य म्हणजे भारतातील सर्वात मोठा प्रवास करणारी ट्रेन कन्याकुमारी से दिब्रूगढ विवेक एक्स्प्रेस अशी या रेल्वेची ओळख असली तरीही या अस्वच्छतेपुढं प्रवासही फिका पडतो इतका हा मुद्दा प्रकर्षानं पुढे आला आहे.
उज्ज्वल व्हिडीओची सुरुवात करतानाच 'स्वागत आहे देशातील सर्वात घाणेरडया ट्रेनमध्ये...' असं म्हणताना दिसतो. आपण यापेक्षा घाणेरडी ट्रेन पाहिलीच नाहीय असं म्हणज या व्लॉगरनं रेल्वेतील स्वच्छता आणि सेवांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ट्रेनच्या आतील दृश्य व्लॉगरनं दाखवली जिथं रेल्वे बोगीमध्ये ठिकठिकाणी कचरा, सामानाची गर्दी, दुर्गंधीमुळं त्रस्त प्रवासी असं एकंदर चित्र दिसत आहे.
साधारण तीन दिवसांसाठी ही ट्रेन एका टप्प्याहून दुसऱ्या टप्प्यावर पोहोचते, मात्र या तिन्ही दिवसांमध्ये एकदाही रेल्वेची स्वच्छता मात्र होत नसल्याची खंत उज्ज्वलनं त्याच्या व्लॉगमध्ये बोलून दाखवली. रेल्वे विभागासाठी या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं एक संदेशही लिहिला, 'प्रिय भारतीय रेल्वे, मला हे पाहून रडू येतंय कारण, भारतीय रेल्वे माझं प्रेम आहे. पण तिची ही अशी अवस्था दयनीय आहे. मी आशा करतो की सामान्य प्रवाशांसाठी ही परिस्थिती सुधारेल.'
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 8 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला. काहींनी त्यावर कमेंट करत त्यात रेल्वेसंदर्भातील आपलेही अनुभव सांगितले. या परिस्थितीसाठी फक्त रेल्वेच नव्हे, तर नागरिकही तितकेच जबाबदार असल्याचाच सूर अनेकांनी आळवला. देशात सार्वजनिक सेवांचा वापर करत असताना सामाजिक भान आणि जबाबदारी ओळखून नागरिकांनी किमान प्रयत्न केले तरीही अशा समस्या उदभवणार नाहीत. मात्र ही वस्तूस्थिती गांभीर्यानं घेतल्यासच हा बदल होईल, अन्यथा आहेत त्या गोष्टी आणखी बिघडण्यास वेळ लागणार नाही हे खरं.