Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा दर दिवशी वाढत असतानाच प्रवासादरम्यान घडणाऱ्या अनेक अप्रिय घटनासुद्धा त्याच वेगानं वाढताना दिसत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान आजही काही प्रवाशांचं सामान आणि मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तुलनेनं मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण अधिक असून, प्रवाशांना यामुळं अनेक समस्यांचा सामनाही करावा लागला आहे. आता मात्र या समस्येवर तोडगा काढणारं एक अॅप प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेत रेल्वे सुरक्षा विभागानं एक महत्त्वाचं पाऊल उचलत प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
Department of Telecommunications (DoT) आणि रेल्वे सुरक्षा विभाग अर्थात आरपीएफ यांनी एकत्र येत प्रवाशांचा हरवलेला मोबाईल मिळवून देत तो ब्लॉक करण्यापासून ट्रेस करण्यापर्यंतच्या सुविधांसाठी एख अॅप लाँच करण्याची तयारी दाखवली आहे. इथं प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो मिळवून देण्यासाठी प्रवाशांची मदत केली जात असल्याची माहिती केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयानं दिली.
यामध्ये संचारण मंत्रालयाच्या 'संचार साथी' प्लॅटफॉर्मच्या मदतीनं पोलिसांमध्ये नोंद असणाऱ्या चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलचा नंबर ब्लॉक केला जातो. तर, 'रेल मदत अॅप' हे भारतीय रेल्वेनं तयार केलेलं मोबाईल अॅप असून या माध्यमातून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारींचं निवारण करण्यात येईल.
केंद्रानं प्रवाशांच्या हितार्थ राबवण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत 17 झोन आणि 70 हून अधिक विभागांमध्ये आरपीएफनं संचार साथी पोर्टल सुरु केलं आहे. त्यामुळं आता प्रवाशांना हरवलेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलसंदर्भातील तक्रार रेल मदत अॅपवर नोंदवता येईल. ज्यानंतर अॅपवरील तक्रार संचार साथी पोर्टलकडे सोपवण्यात येणार असून तिथं मोबाईल ब्लॉक करण्यासाठीची कारवाई सुरू होईल.
आतापर्यंत CEIR च्या मदतीनं 30 लाख मोबाईल डिवाईस ब्लॉक करण्यात आले असून, 18 लाख मोबाईल ट्रेस करण्यात आले. यातील 3.87 मोबाईल हँडसेट पोलिसांनी तपासातून परतही मिळवले. तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी या प्रणालीचा वापर करत प्रवासी, नागरिकांची सुरक्षितता प्राधान्यस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं.