Marathi News> भारत
Advertisement

मध्यप्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात फूट 

मध्यप्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भोपाळ : मध्यप्रदेश काँग्रेसचा अंतर्गत वादत आता बाहेर येत आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात फूट पडली आहे. सरकार विरोधात आंदोलन करण्याची धमकी देणारे सिंधिया दिल्लीतील समन्वय समितीची बैठक सोडून निघून गेले. तर सिंधिया यांना रस्त्यावर उतरायचं असेल तर ते उतरू शकतात, असा इशार कमलनाथ यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातील वाद पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचला आहे. शनिवारी काँग्रेसच्या बैठकीत सिंधिया बैठक मध्येच सोडून गेले. कमलनाथ हे देखील सिंधिया यांच्या विरोधात कडक भूमिकेत दिसले.

हा वाद सुरु असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, ''संपूर्ण काँग्रेस पक्ष सिंधिया यांच्यासोबत आहे. आम्ही सगळ्यांनी घोषणापत्रात जे आश्वासन दिलं आहे. ते कमलनाथजी पूर्ण करतील. कामांना गती देण्यात आली आहे.'

काँग्रेस नेत्यांनी मात्र बैठकीत असं काही घडलं नसल्याचं म्हटलं आहे. सिंधिया यांची पूर्वनियोजित दुसरी बैठक होती त्यामुळे ते लवकर गेल्याचं काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी आणि शिक्षकांना नियमित करण्याचं आश्वासन पूर्ण होत नसल्याने सिंधिया यांनी नाराजी व्यक्त केली होती. ,वेळ आली तर कमलनाथ सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरु,' असं देखील त्यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देतांना कमलनाथ यांनी म्हटलं होतं की, 'आश्वासन ५ वर्षात पूर्ण करण्याचं होतं. ५ महिन्यात नाही.'

Read More