Marathi News> भारत
Advertisement

जम्मूकरांनी अनुभवलं गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक थंड वातावरण

तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज

जम्मूकरांनी अनुभवलं गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक थंड वातावरण

श्रीनगर : थंडीचा कडाका संपूर्ण देशात जरा जास्तच जोर धरत असताना उत्तर भारतात याचे थेट परिणाम आता दैनंदिन जीवनावर होऊ लागले आहे. जम्मू आणि काश्मीर भागात तर, थंडीचा कडाका दिवसागणिक वाढतच चालला आहे. येथील परिसरामध्ये धुक्याचं प्रमाणही वाढल्यामुळे हवाई वाहतुकीवर त्याचे थेट परिणाम झाले आहेत. 

सोमवारी जम्मूकडे येणाऱी आणि येथून जाणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली होती. मंगळवारीही विमानसेवेच्या वेळापत्रकांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जम्मूमध्ये गेल्या पाच वर्षांमधील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी जम्मूमध्ये तापमान ०.९ अंशांवर पोहोचलं होतं. ज्यानंतर जम्मूमध्ये तापमानाचा पारा २.४ अंश सेल्शिअसवर पोहोचला, तर श्रीनगरमध्ये तापमान उणे ६.५ अंशांवर पोहोचला आहे. बनिहाल भागात उणे १.६ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. 

जम्मू आणि काश्मीर परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी, थंडीचा कडाका अतिशय वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचं रुंदीकरण आणि हिमवृष्टी यांमुळे राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील वाहतुकीवर याचे थेट परिणाम झाले आहेत. 

वाचा : १९०१ सालानंतर दिल्लीतील डिसेंबर महिन्याचा सर्वात थंड दिवस

पंजाबकडून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडलं आहे. एकिकडे जम्मूमध्ये तापमानाचा पारा खाली जात असतानाच दुसरीकडे लडाखमधील द्रास येथे तापमानाने उणे २८.८ अंश, लेहमध्ये उणे २०.१ अंश इतका आकडा गाठला आहे. काश्मीरमधील पहलगाममध्येही तापमानाने निचांक गाठला आहे. सध्याच्या घडीला त्या ठिकाणचं तापमान उणे १०.२ अंश आणि गुलमर्ग येथील तापमान उणे ७.८ अंशावर पोहोचलं आहे. 

काश्मीर प्रांताचं म्हणावं तर, इथे सध्या 'चिल्लई कलां' म्हणजेच वर्षातील सर्वाधिक बोचऱ्या थंडीच्या चाळीस दिवसांचा काळ सुरु आहे. ज्यामध्ये सातत्याने होणारी बर्फवृष्टी, तापमानाचं निचांकी आकड्यावर पोहोचणं अशा घटना पाहायला मिळतात. हा काळ ३१ जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे. 

Read More