Gulmarg fashion show row : जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir Gulmarg) गुलमर्ग भागामध्ये हल्लीच एका फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. चहुबाजूंनी शुभ्र बर्फाचं अच्छादन असणाऱ्या या भागात आयोजित केलेल्या फॅशन शोमुळं स्थानिकांनी कडाडून विरोधाचा सूर आळवला. ज्यामुळं अखेर हा विरोध पाहता कार्यक्रमाच्या आयोजकांसह फॅशन डिझायनरनंही झाल्या प्रकाराबद्दल क्षमा मागत या कार्यक्रमाच्या आयोजनामागे फक्त पारंपरिक सौंदर्य आणि मॉडर्न फॅशनची सांगड घालत पर्यटनाला वाव देण्याचा हेतू होता असं स्पष्टीकरण सध्या देण्यात येत आहे.
गुलमर्ग इथं पार पडलेल्या या फॅशन शोमध्ये सेलिब्रिटी फॅशन डिझायनर शिवन आणि नरेश यांनी त्यांचं कलेक्शन सादर केलं होतं. यामध्ये जम्मू काश्मीरचं पारंपरिक सौंदर्य जपणं हा हेतूसुद्धा केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता.
भारतातील स्वर्ग अशी ओळख असणाऱ्या काश्मीर प्रांतात सध्या गुलमर्ग येथील फॅशन शोमुळं काही संवेदनशील विषयांवरील चर्चांना वाव मिळताना दिसत आहे. सदर आयोजनामुळं स्थानिक संस्कृतीसह नागरिकांच्या धार्मिक भावनांवर थेट परिणाम होऊन सोशल मीडियावर या कार्यक्रमानंतर संमिश्र चर्चांना वाव मिळताना दिसला. एकिकडे काहींनी हा फॅशन शो म्हणजे एक सकारात्मक बदल म्हटला तर, निंदा करणाऱ्यांनी मात्र ही बाब स्पष्टपणे नाकारली.
जम्मू काश्मीरमधील मुफ्ती नासिल उल इस्लाम यांनी या फॅशन शोला कडाडून विरोध करत रमजानच्या पवित्र महिन्यात झालेल्या या आयोजनाबाबत नाराजीचा तीव्र सूर आळवला. 'रॅम्पवर अर्थनग्न पुरुष आणि महिला चालत होत्या आणि हे अजिबातच स्वीकारार्ह नाही. हे आमच्या संस्कृती आणि धार्मिक समजुतींच्या विरोधात आहे. त्यासोबतच या कृत्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी', अशी मागणी मुफ्तींनी केली.
दरम्यान या फॅशन शोवरून एकंदर सुरु असणारं वादंग पाहता तिथं उपस्थित राहिलेल्या जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या आयोजनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत अशा संधी पर्यटनाला वाव देण्यात येणार असून काश्मीरकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल असं मत त्यांनी मांडलं. शिवाय नागरिकांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे असा आग्रही सूरही त्यांनी आळवला.