पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावावर पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. तो म्हणजे सातव्यांदा मुख्यमंत्री पदावार विराजमान होण्याचा. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे. उद्या म्हणजे सोमवारी ते बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आज पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजप नेते सुशील कुमार मोदी शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत जोडीयू, भाजप, हम आणि व्हीआयपी पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते. याशिवाय भाजपा नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसर उद्या सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शपथविधी कार्यक्रम राजभवनात संपन्न होणार आहे.
JD(U) Chief Nitish Kumar named as the next Chief Minister of Bihar, in NDA meeting at Patna
— ANI (@ANI) November 15, 2020
Visuals from NDA meeting at Patna, Bihar pic.twitter.com/Xz8Fr0WDw5
१९८५ साली प्रथम निवडून आलेले आमदार नितीशकुमार यांनी सहा वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्या सातव्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा २००० साली ३ मार्च ते १० मार्च या सात दिवसांसाठी मुख्यमंत्री पद भूषवले होते.
त्यानंतर दुसऱ्यांदा २४ नोव्हेंबर २००५ ते २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिलं. तिसऱ्यांदा २६ नोव्हेंबर २०१० ते १७ मे २०१४ पर्यंत त्यांनी राज्याची सत्ता हाती घेतली. चौथ्यांदा त्यांनी २२ फेब्रुवारी २०१५ ते १९ नोव्हेंबर २०१५ पर्यंत बिहारमध्ये नितीश कुमारांची सत्ता होती.
त्यानंतर २० नोव्हेंबर २०१५ ते २६ जुलै २०१७ पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिलं असून २७ जुलैपासून ते आतापर्यंत त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. अखेर आता पुन्हा म्हणजे सातव्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.