मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात एका अंडी विक्रेता आणि ज्यूस विक्रेताला आयकर विभागाने करोडोंचा जीएसटी भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. दोघेही कुटुंबातील एकमेव कमावणारे असून ही नोटीस आल्यानंतर चिंताग्रस्त झाले आहेत.
आयकर विभागाच्या नोटीसमध्ये दिसत आहे की, 2022 मध्ये दिल्लीच्या स्टेट झोन 3, वॉर्ड 33 मध्ये "प्रिन्स एंटरप्रायझेस" नावाची कंपनी श्री सुमन यांच्या नावावर नोंदणीकृत होती. ही फर्म चामडे, लाकूड आणि लोखंडाच्या व्यापारात गुंतलेली होती आणि गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचा आरोप आहे. "मी फक्त अंडी विकतो. मी कधी दिल्लीलाच गेलेलो नाही, मग कंपनी सुरु करण्याचा प्रश्न कुठून येतो," असं सुमन यांनी म्हटलं आहे.
त्यांचे वडील धार सुमन हे छोटं दुकान चालवतात. जर आमच्याकडे 50 कोटी असते, तर आम्ही रोजच्या खर्चासाठी कशाला धडपडत बसलो असतो असं ते म्हणाले आहेत. दरम्यान कुटुंबाच्या वकिलांनी सुमन यांच्या खासगी कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आल्याची शंका आहे."कोणीतरी घोटाळा करण्यासाठी प्रिन्सच्या कागदपत्रांचा गैरवापर केला आहे. आम्ही याप्रकरणी पोलीस आणि कर प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे," असं ते म्हणाले आहेत.
20 मार्चच्या नोटीसमध्ये, आयकर विभागाने एकूण 49.24 कोटींच्या आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती मागितली. त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी बिलं, खरेदी व्हाउचर, वाहतूक रेकॉर्ड आणि बँक स्टेटमेंट यासारखी कागदपत्रे देखील मागितली.
सुमन हे एकटेच नाहीत. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील ज्यूस विक्रेते मोहम्मद रहीस यांना 7.5 कोटींपेक्षा जास्त रकमेची आयकर नोटीस मिळाली आहे, ज्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंब गोंधळात पडले आहे. "ही नोटीस का जारी करण्यात आली आहे हे मला माहित नाही. मी फक्त ज्यूस विकतो. मी इतके पैसे कधीच पाहिले नाहीत. आता मी काय करावं?" अशी हतबलता त्यांनी मांडली आहे.
"मी सरकारला मला मदत करण्याची विनंती करतो. मी एक गरीब माणूस आहे. मला खोट्या प्रकरणात अडकवू नये," अशी विनंतीही त्यांनी केली आहे. नोटीसमध्ये 2020-21 मध्ये त्यांच्या नावाने झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बोगस व्यवहारांकडे लक्ष वेधण्यात आलं. अशा प्रकारे, त्यांच्यावर 7,79,02,457 रुपयांचा सरकारी जीएसटी थकला होता.
"आम्ही आयकर अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला विचारले की मी माझी वैयक्तिक कागदपत्रं कोणासोबत शेअर केली आहेत का? मी सांगितलं की मी ते कधीही कोणाशी शेअर केले नाहीत," असं रहीस म्हणाले.
रहीसच्या आई म्हणाल्या: "आम्हाला आमच्या रोजच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो... जर आमच्याकडे इतके पैसे असते तर आमच्या मुलाला इतके कष्ट का करावे लागले असते?"