Marathi News> भारत
Advertisement

'कमलनाथ'च असतील मध्यप्रदेशचे 'नाथ', सूत्रांची माहिती

मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये चुरस

'कमलनाथ'च असतील मध्यप्रदेशचे 'नाथ', सूत्रांची माहिती

नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा कमलनाथ यांच्याच खांद्यावर देण्यात येणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जातं आहे. आज कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेणार आहेत. याच बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित होणार आहे. काल संध्याकाळी कमलनाथ यांच्या नावावर आमदारांचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भातला अहवाल राहुल गांधींना देण्यात आलाय. त्यामुळे कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे आज संध्याकाळी दिल्लीतून भोपाळला येऊन राज्यपालांची भेट घेतील. त्यामुळे कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी शुक्रवारीच होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

काल दिवसभराची रस्सीखेच झाल्यावर मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये आज सकाळी कमलनाथ यांच्याच खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा येणार हे स्पष्ट होतं आहे. काल दिवसभर भोपाळ शहरात ज्योतिरादित्य शिंदेंच्या समर्थकांनी बाईक रॅली काढून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. तर कमलनाथ यांचेही समर्थक मोठ्या संख्येनं शहरात उपस्थित होते. 

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आज अनेक हालचालींना वेग आला. पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, इच्छुक ज्योतिरादित्य शिंदेही या दरम्यान राहुल गांधींच्या घरी पोहोचले. सोनिया, राहुल, ज्योतिरादित्य यांच्यात बैठक झाली. थोड्याच वेळात राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला चांगल यश मिळाल्यानंतर पक्षांतर्गत मुख्यमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली. दोन्ही ठिकाणी युवा नेत्यांना संधी देण्याची मागणी होत आहे. मात्र, जुन्या कार्यकर्त्यांनी आधीच्या मुख्यमंत्र्याना आणि ज्येष्ठ नेत्यांच्या नावाचा आग्रह केला आहे. 

काँग्रेसच्या या बैठकीत पर्यवेक्षक के सी वेणुगोपाल आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे देखील उपस्थित आहेत. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये सचिन पायलट हवेत, अशी युवा कार्यकर्त्यांची मागणी आहे. सचिन पायलट यांचे समर्थक गुरुवारी दिल्लीत दाखल झालेत. काँग्रेस मुख्यालयासमोर त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 'सचिन... सचिन' अशी घोषणाबाजी करत त्यांनी पक्ष प्रमुखांकडे पायलट यांनाच राजस्थानची जबाबदारी सोपवण्याची मागणी केली. 

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला आणला जाऊ शकतो. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चुरस आहे. त्यामुळे कोणा एकाला मुख्यमंत्रीपद मिळाल्यास, पक्षात गटबाजी होण्याची भीती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉ़र्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. 

Read More