Delhi Karan Dev Murder Case: राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. येथील उत्तम नगरमध्ये 36 वर्षीय व्यक्तीचा रहस्यमय परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचं अनेकांना वाटलं. वीजेचा झटका लागून ही व्यक्ती मरण पावल्याचं सांगण्यात आलं. मात्र आता या प्रकरणामध्ये नवीन हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. या व्यक्तीच्या पत्नीनेच पतीच्या चुलत भावाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांमधून पतीला संपवल्याचं समोर आलं आहे. दोन्ही आरोपींमधील इन्स्टाग्राम चॅटमधून हा खुलासा झाला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी सकाळी दिल्लीतील जनकपुरीमधील एका रूग्णालयात विजेचा झटका लागल्याने करण देव याला दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. पत्नी सुष्मितानेही पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये घरात विजेचा झटका बसल्याने नवरा बेशुद्ध पडल्याचं सांगितलं. कुटुंबाने हा मृत्यू अपघाताने झाला असल्याचे मानून शवविच्छेदन करण्यास नकार दिला. पीडित व्यक्तीचे वय कमी असल्याने आणि त्याच्या मृत्यूसंबंधित परिस्थिती पाहता पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरला. हरिनगर इथल्या दीनदयाळ उपाध्याय रूग्णालयात मृतदेह शविविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान मयत व्यक्तीची पत्नीचा मोबाईल तपासण्यात आला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. इन्स्टाग्रामवरुन सुष्मिताने मयत करण देवचा धाकटा भाऊ कुणाल देवला मेसेज केल्याचं आढळून आलं. यामध्ये करणला कसं संपवता येईल याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचं दिसून आलं. कुणालने बिंग फुटल्यानंतर 16 जुलै रोजी स्वत: पोलिसांकडे हे इन्स्टाग्राम चॅटचे स्क्रीनशॉट सादर केले.
12 जुलैच्या रात्री सुष्मिताने करणच्या जेवणामध्ये झोपेच्या 15 गोळ्या टाकल्याचं या इन्स्टाग्राम चॅटमधून समोर आलं आहे. या गोळ्यांमुळे करणला तातडीने काहीही झालं नाही. त्यामुळे सुष्मिता आता आपण पकडले जाणार असा विचार करुन घाबरली. तिने राहुलला मेसेज केला. "औषध घेतल्यानंतर मृत्यू होण्यास किती वेळ लागतो ते एकदा बघ. त्याने जेवण करुन तीन तास झाले. त्या उलट्या झाल्या नाही, काही त्रासही झाला नाही आणि अजून त्याचा मृत्यूही नाही. मग आपण काय करायचे? काहीतरी सुचव," असं सुष्मिताने मेसेजमध्ये म्हटलं होतं.
सुष्मिताच्या या मेसेजवर समोरुन राहुलने, "जर तुला काही कळत नसेल तर त्याला शॉक दे,” असं उत्तर दिलं. त्यावर सुष्मिताने, "शॉक देण्यासाठी त्याला कसं बांधू?" असा प्रश्न विचारला. यावर राहुलने, "टेपने बांध" असं उत्तर दिलं. या मेसेजनंतर सुष्मिताने, "त्याच्या श्वासांची गती मंदावली आहे," असा मेसेज राहुलला केला. "तुझ्याकडे असलेली सगळी औषधं त्याला दे," असा सल्ला राहुलने समोरुन दिली. यानंतर सुष्मिताने राहुलला मेसेज करुन, "मला त्याचं तोंड उघडता येत नाहीये. मी त्याच्या तोंडात पाणी ओतू शकते पण त्याला औषध देता येत नाहीये. तू इथे ये. कदाचित आपण मिळून त्याला गोळ्या चारु शकतो," असं सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी करणला शांत झाल्यानंतर विजेचा झटका देऊन त्याला मारलं. या दोघांनी अपघाताने करणचा मृत्यू झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्यांमुळे करण लगेच बेशुद्ध झाला नाही. तेव्हा सुष्मिता आणि राहुलने करणला झोपेच्या गोळ्यांमुळे गुंगी आल्याने तो शांत झाला. करण जिवंत असतानाच या दोघांनी त्याच्या बोटाला वीजेचा शॉक देण्याचा निर्णय घेतला.
करणचा मृत्यू झाल्यानंतर सुष्मिता जवळच तिच्या सासरच्या घरी गेली आणि त्यांना सांगितले की करणला विजेचा झटका लागला. कुटुंबीयांनी तातडीने घरात जाऊन त्याला रूग्णालयात नेले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर करणच्या चुलत भावाने त्याच्या शवविच्छेदनाला तीव्र विरोध केला. मात्र विरोध असूनही नियम आणि तरुणपणी अनैसर्गिक मृत्यूबाबतच्या संशयामुळे पोलिसांनी शवविच्छेदन प्रक्रिया करण्यास सांगितले.