Kareena Kapoor Prada Got Offer From Purepur Kulhapurr : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. करीना कपूरची ही बाजू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. बेबोनं कायम तिच मत जे असेल ते स्पष्टपणे मांडलं. मग तिची कोणतीही मुलाखत असो किंवा सोशल मीडिया पोस्ट असो. आता करीना कपूरनं सोशल मीडियावर PRADA ला ट्रोल करत एक पोस्ट शेअर केली असून त्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. आता करीना कपूरसाठी 'पुरेपूर कोल्हापूर'नं एक पोस्ट शेअर केली आहे.
करीनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये करीनानं कोल्हापुरी चप्पल घालत फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत करीनानं कॅप्शन दिलं की 'सॉरी ही प्राडा नाही, पण माझी ओरिजनल कोल्हापुरी आहे.' करीनानं शेअर केलेल्या या पोस्टनं सगळ्यांची मने जिंकली. करीनानं कोल्हापूरला जो पाठिंबा दिला हे पाहता 'पुरेपूर कोल्हापूर'नं करीना आणि सैफसाठी आयुष्यभराची एक ऑफर दिली आहे.
'पुरेपूर कोल्हापूर'नं त्यांच्याा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सुरुवातीला त्यांनी करीनानं सगळ्यांना पाठिंबा दिल्याचे म्हणत आभार मानले आहे. त्यानंतर ते म्हणाले, "करीना ताई आणि सैफ भाउजीस्नी 'पुरेपूर कोल्हापुर' मदी आयुष्यभर जेवण फ्री." त्यासोबत त्यांनी त्यांच्या हॉटेलचा पत्ता देखील दिला आहे. 'पुरेपूर कोल्हापूर, शॉप नं. 4,5,6, तळमजला, आराम बाग, वीर सावरकर पथ ठाणे (प)-400602 +9136035244 +9136015244.' याशिवाय त्यांनी त्यांच्या पुण्याच्या ब्रांचचा देखील पत्ता दिला आहे. 'शोरूम नंबर 2. अप्पर ग्राउंड फ्लोअर, प्लॉट नं 575, शिरोळे रोड, शिवाजीनगर, पुणे 411 004, +91 92099 20209'
हे शेअर करत पुरेपर कोल्हापुरनं कॅप्शन दिलं की "गेल्या आठवड्यात PRADA या इटालियन फॅशन ब्रँडने आपल्या कोल्हापुरी चप्पलेचं डिझाईन चोरलं, गदारोळ झाला. कायदेशीर लढाई पण सुरू झाली. यातच सुपरस्टार करीना कपूर खान यांनी कोल्हापूर करांच्या बाजूने उभे रहात इन्स्टाग्रामवर आपली THE ORIGINAL कोल्हापुरी चप्पल घालून ती PRADA नसल्याचे लिहले."
करीनाविषयी बोलायचं झालं तर सध्या ती तिचा नवरा सैफ आणि मुलं तैमूर आणि जेहसोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबासोबत लंडनच्या रस्त्यांवर आणि रेस्टॉरंटमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसली.