Karnataka Election 2023 : काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. सत्तेत आल्यास 200 युनिट मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवासाचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पक्षाने मोफत वीज पुरवेल असे आश्वासन देताना कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये दिले जातील असे म्हटलेय.
तसेच भाजप सरकारने केलेले सर्व जनविरोधी कायदे रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी आपल्या जाहीरनाम्यात कर्नाटकातील भाजप सरकारने राज्यात सत्तेवर आल्यानंतर एक वर्षाच्या आत सर्व अन्यायकारक कायदे आणि लोकविरोधी कायदे रद्द करण्याचे आश्वासन दिले.
Karnataka Polls: "Will ban...," Congress cites Bajrang Dal, PFI in manifesto
— ANI Digital (@ani_digital) May 2, 2023
Read @ANI Story | https://t.co/dPNHfON1oR#KarnatakaElections2023 #KarnatakaElections #Congress #PFI #Manifesto pic.twitter.com/hV7tPVZsxW
जाती किंवा धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. आमचा असा विश्वास आहे की कायदा आणि संविधान पवित्र आहे आणि बजरंग दल, पीएफआय किंवा इतर बहुसंख्य किंवा अल्पसंख्याक समुदायांमधील शत्रुत्व किंवा द्वेष वाढवणार्या व्यक्ती आणि संघटनांद्वारे त्यांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. आम्ही अशा कोणत्याही संघटनांवर बंदी घालण्यासह कायद्यानुसार निर्णायक कारवाई करु, असे काँग्रेसकडून आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने जारी केलेल्या जाहीरनाम्याला 'खोट्या लूटमारीचा जाहीरनामा' असे वर्णन करुन काँग्रेसने सोमवारी म्हटले की, लोक सत्ताधारी पक्षाच्या 'खोटे' आणि 'बकवास विधानांना' कंटाळले आहेत. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे, हा भाजपचा खोटा जाहीरनामा आहे. मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तीनदा वाढ केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी वर्षभरात दोन सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. आज कर्नाटकातही दरवर्षी तीन सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. हा केवळ दिखावूपणा आहे.
दरम्यान, भाजपने एक दिवसापूर्वी जाहीरनामा जारी केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळी या महिन्यांत दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) जीवन जगणाऱ्या सर्व कुटुंबांना तीन मोफत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देण्याचा आश्वासन दिले आहे. राज्यातील 224 सदस्यीय विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.