Karnataka Movie Ticket Price: कर्नाटक सरकारने चित्रपटप्रेमींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटरसाठी तिकीटाची कमाल किंमत 200 रुपये इतकी निश्चित केली आहे. हा निर्णय कन्नड चित्रपटांना चालना देण्यासाठी आणि प्रेक्षकांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आला आहे. दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी आधीच चित्रपट तिकिटांच्या कमाल किमतीसाठी मर्यादा घालून दिल्या आहेत. ज्यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आधीपासूनच चित्रपटांच्या किंमतीबाबत असे नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान अशातच कर्नाटक सरकारने लागू केलेला 200 रुपयेचा समान दराचा नियम प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.
बेंगळुरूमध्ये मंगळवारी रात्री सरकारने या निर्णयाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आता कर्नाटकमधील कोणत्याही थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी तिकिटाची किंमत 200 रुपये पेक्षा जास्त नसणार आहे. ही मर्यादा करांसह लागू करण्यात आली आहे. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात हे आश्वासन दिले होते. जे आता त्यांनी अंमलात आणले आहे. सिद्धरामय्या यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फायदा आता थेट चित्रपट प्रेमींना होणार आहे. अनेक चित्रपट प्रेमी हे चित्रपटाचे तिकीट बघून चित्रपट बघण्यास नकार देत होते अशा चित्रपट प्रेमींना आता फक्त 200 रुपयांमध्ये कोणताही चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहता येणार आहे. या आधी हेच दर 500 ते 1000 रुपयांपर्यंत होते.
सरकारच्या निर्णयाचा फायदा कोणाला?
कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि कर्नाटक फिल्म प्रदर्शक संघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते स्वस्त दरातील तिकीटांमुळे कन्नड चित्रपटांना नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे की हा निर्णय केवळ आर्थिक नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. कन्नड सिनेमा ही राज्याची ओळख आहे आणि ती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणे खूप आवश्यक आहे.
याआधी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये निर्णय
कर्नाटक सरकारने घेतलेला हा निर्णय याआधी तामिळनाडूमध्ये देखील घेण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये चित्रपटांची तिकिटाची किंमत आधीपासूनच 60 ते 200 दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने 2022 मध्ये थिएटर चार वर्गांमध्ये विभागून वेगवेगळ्या किंमती जाहीर केल्या होत्या. ज्यामध्ये मल्टिप्लेक्समधील रिक्लायनर सीटसाठी 250 रुपये दर निश्चित आहे. तेलंगणामध्ये देखील तिकीट दरांवर मर्यादा आहेत. तिथे सामान्य सीटसाठी 295 आणि प्रीमियमसाठी 350 रुपये इतका दर आहे.
मात्र या सर्व राज्यांमध्ये तिकीट किंमत थिएटर आणि आसनांच्या प्रकारानुसार बदलते. कर्नाटकचा मॉडेल थोडा वेगळा आहे कारण येथे प्रत्येक प्रकारच्या सीटसाठी आणि थिएटरसाठी 200 रुपयांची समान मर्यादा लागू केली आहे.