कर्नाटकातील गोकर्ण येथे एक महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलींसह जंगलातील गुहेत राहत असल्याचं आढळलं होतं. नीना कुटीना उर्फ मोही अशी या 40 वर्षीय महिलेची ओळख पटली आहे. अलीकडेच झालेल्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्कल पोलीस निरीक्षक श्रीधर आणि त्यांचं पथक गस्त घालत असताना एका गुहेच्या बाहेर काही कपडे बांधण्यात आल्याचं त्यांना दिसलं. संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिलं असता गुहेत महिला आपल्या दोन मुलींसह आढळली. तपासादरम्यान महिलेने याआधीही अनेकदा या गुहेत वास्तव्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तर कन्नडचे पोलिस अधीक्षक एम. नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने चौकशीदरम्यान यापूर्वी किमान दोन किंवा तीन वेळा मानसिक शांततेच्या शोधात या गुहेत वास्तव्य केल्याची माहिती दिली आहे.
"महिलेसाठी ही नवीन जागा नाही. आपण मानसिक शांततेच्या शोधात याआधीही एक ते दोन वेळा येथे वास्तव्य केल्याचं तिने सांगितलं आहे. तिच्या दोन्ही मुलींचा जन्म भारतात झाला आहे. तिची मोठी मुलगी साडे सहा वर्षांची आणि लहान मुलगी चार वर्षांची आहे. तिने आपला पती किंवा मुलींच्या वडिलांबद्दल काहीही माहिती दिली नसून त्याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे," असंही त्यांनी सांगितलं.
शुक्रवारी, अधिकाऱ्यांनी रामतीर्थ टेकडीच्या दाट झुडुपांमधून गस्त घातली असता त्यांना गुहेत मोही आणि तिची दोन मुलं आढळली. आतमध्ये नीना मोठ्या मुलीला दिव्याच्या मंद प्रकाशात शिकवत होती. तर लहान मुलगी कपडे न घालता तिथे फिरत होती असं पोलिसांनी सांगितलं आहे.
अधिकाऱ्यांनी हा परिसर धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. येथे भूस्खलन होण्याची शक्यता असून, किंग कोब्रा, बिबटे आणि रानडुक्करांचं वास्तव्य असतं. “उतार आणि सापांनी वेढलेलं हे ठिकाण मुलांसाठी धोकादायक होतं. आध्यात्मिक शांतीसाठी आपण प्रार्थना आणि ध्यान करत होतो असा तिचा दावा आहे. तिला शांतपणे समजावण्यात आलं आणि मुलींसह गुहेतून बाहेर काढण्यात आले,” असं एसपी नारायण म्हणाले.
मोही 2016 मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती, ज्याची मुदत 2017 मध्ये संपली होती. ती गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये काम करत होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिथे झालेल्या वादानंतर ती गोवा सोडून नेपाळ आणि गोकर्णाच्या आसपासच्या जंगलांमध्ये राहायला गेली. नंतर अधिकाऱ्यांनी परिसरात शोध घेत असता तिचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त केला. "व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती राहिली होती, ती नेपाळला गेली होती आणि नंतर गोकर्णमध्ये परतली होती," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
कुटुंब सध्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या देखरेखीखाली आहे. त्यांना सध्या 80 वर्षीय साधू स्वामी योगरत्न सरस्वती चालवत असलेल्या बंकीकोडला गावातील आश्रमात ठेवण्यात आलं आहे.
"पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणि त्यांच्या देशात सुरक्षित परतण्याची व्यवस्था करण्यासाठी रशियन दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी त्यांना बंगळुरूमधील FRRO अधिकाऱ्यांकडे सोपवलं जाईल," असंही त्यांनी सांगितलं.
अधिकाऱ्यांनीही महिला तिच्या जंगलातील जीवनाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत होती असंही सांगितलं आहे. "गुहेतील आमचे शांत जीवन संपलं आहे - आमचे गुहेतील घर उद्ध्वस्त झाले आहे आणि आता आम्हाला आकाश, गवत किंवा धबधबा नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे, थंड, कडक जमिनीवर झोपले आहे, असे म्हटले जाते की 'पाऊस आणि सापांपासून संरक्षित'... आम्ही तुमच्या प्रत्येकाला दयाळू, मुक्त आणि सुंदर जीवनाची शुभेच्छा देतो, मूर्खांच्या संकुचित मनापासून आणि कृतींपासून अस्पृश्य राहावे," अशी पोस्ट तिने अलीकडेच शेअर केली होती.