Kedarnath Yatra 2025: उत्तराखंडमधील (Uttarakhand) पर्वतांमध्ये स्थित असणाऱ्या चारधाम (Chardham Yatra 2025) यात्रेला सुरुवात झाली असून, चारही धामांवर सध्या भाविकांची रिघ पाहायला मिळत आहे. त्यात तुलनेनं उत्तराखंडच्याच केदारनाथ भागात येणाऱ्यांचा आकडा दरवर्षीप्रमाणं यंदाही तितकाच मोठा असल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असतानाच दुसरीकडे मात्र सध्या या यात्रेवर भीतीचं सावट पाहाला मिळत आहे. कारण ठरतोय तो म्हणजे एक विचित्र आजार.
सरकारपुढंही आव्हानं निर्माण करणाऱ्या एका गंभीर आजाराचं सावट सध्या केदारनाथ यात्रा परिसरात पाहायला मिळत असून, त्यामुळं प्रशासनही सतर्क झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घोडे आणि खच्चर या प्राण्यांमध्ये एक्वाइन इन्फ्लूएंजा व्हायरसची लक्षणं आढळली असून, त्यामुळं सध्या इथं सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
सचिव पशुपालन डॉ. पुरुषोत्तम यांनी रुद्रप्रयाग इथं पोहोचून तिथं जिल्हा प्रशासनासह समीक्षा बैठक केली आणि या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर केदारनाथ यात्रेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या घोडे आणि खच्चरांच्या वापरावर 24 तासांसाठी बंदी घालण्यात आली. या वेळेत या विषाणूजन्य आजारासंदर्भातील तपासणी आणि निरीक्षण प्रशासनाकडून केलं जाणार असल्याची माहिती समोर आली.
केदारनाथ यात्रेमध्ये दर दिवशी साधारण 8 ते 9 हजार खच्चर वापरले जातात. सामान आणि यात्रेकरूं ना वाहून नेण्यासाठी म्हणून हा प्रवास केला जातो. आता मात्र याच प्राण्यांमधील इन्स्फ्लूएंजा व्हायरसची समस्या समोर आल्यामुळं प्रशासनानं यात्रेदरम्यान अधिक सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
केदारनाथ मंदिर परिसरात फोफावणारा हा आजार एक विषाणूजन्य व्याधी असून, घोडे आणि खच्चरांमध्ये त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळतो. असं म्हणतात की या आजाराचा संसर्ग प्राण्यांमध्ये पाहायला मिळतं. जिथं प्राण्यांमध्ये ताप येणं, श्वसनास त्रास, खोकला आणि अशक्तपणा अशी लक्षणं आढळतात. योग्य उपचार न मिळाल्यास या संसर्गामुळं मृत्यूही ओढावतो. याच कारणास्वत परिस्थिती आणखी बिघडू न देण्यासाठी म्हणून उत्तराखंड प्रशासन सध्या या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.