Marathi News> भारत
Advertisement

'या' खाणीच्या कचऱ्यातही सोनं! 24 वर्षानंतर पुन्हा लिलाव; भारताला मालामाल होण्याची 'सुवर्ण'संधी

KGF gold auction: या देशात मिळाली सोन्याची खाण, त्या देशात कुदळ मारली तिथं निघालं सोनं या अशा कैक वृत्तांनंतर आता चक्क भारतातील एका सोन्याच्या खाणीनं सर्वांचच लक्ष वेधलं आहे.   

'या' खाणीच्या कचऱ्यातही सोनं! 24 वर्षानंतर पुन्हा लिलाव; भारताला मालामाल होण्याची 'सुवर्ण'संधी

KGF Gold Auction: 'केजीएफ' (KGF) हा चित्रपट अनेकांच्याच लक्षात असेल. या दाक्षिणात्य चित्रपटाला जगभरातील सिनेरसिकांनी कमालीची पसंती दर्शवली होती. तिथूनच चर्चेत राहिलेला शब्द होता KGF. ही झाली रुपेरी पडद्याची गोष्ट. मात्र प्रत्यक्षातही कर्नाटकमध्ये असणाऱ्या कोलार गोल़्ड फिल्ड्समुळं भारत मालामाल होऊ शकतो याच शंकाच नाही. 

कर्नाटकातील ही सोन्याची खाण बंद झाल्याच्या जवळपास 24 वर्षांनंतर आता Ministry Of Mines कडून येथील नऊ मोठे सोन्याचा अंश असणाऱ्या ढिगऱ्यांचा लिलाव केला जाणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ढिगाऱ्यांमधून पॅलेडियं, ऱ्होडियम यांसारखे दुर्लभ धातूसुद्धा सापडणार असल्यामुळं यातून मोठा फायदा देशाच्या तिजोरीत भर टाकू शकतो. 

एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार या ढिगाऱ्यांचीच किंमत 30000 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लिलावाची जबाबदारी SBI कॅप्सना दिली असून ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15 ते 24 महिने लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. सदर मंत्रालयाशी संलग्न अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सूत्रांच्या माहितीनुसार सोन्याचे दर प्रतिग्राम 9000 रुपये असल्य़ा कारणानं प्रति टन 1 ग्राम सोनं मिळाल्यासही ही फायद्याचीच बाब ठरणार आहे. 

ढिगाऱ्यातून किती सोनं मिळण्याचा अंदाज?

कोलार गोल्ड फिल्ड्समध्ये असणाऱ्या जवळपास 3 कोटी टन खाणीच्या खोदकामातून निघालेल्या या ढिगाऱ्यामध्ये सोनं आणि इतरही काही मौल्यवान धातू सापडण्याची शक्यता आहे. एका सरकारी अहवालातील माहितीनुसार या 'कचऱ्यातून' प्रति टन 2 ग्राम सोनं आणि पॅलेडियम सापडू शकतं ज्याची साधारण किंमत 36000 रुपये इतकी असू शकते. ऱ्होडियमसारखे धातूसुद्धा या ढिगाऱ्यात सापडून या रकमेत आणखी भरच पडू शकते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सायनाईडचा वापर केला जाणार नसून ती पर्यावरणपूरक प्रक्रिया असेल अशीही माहिती समोर येत आहे. 

लिलावाला राज्य शासनाची मंजुरी... 

कर्नाटकातील शासनानं 2024 मध्ये कोलार गोल्ड फील्ड्स (KGF) च्या लिलावासाठी मंजुरी दिली होती. सध्या हे ढिगारे भारत गोल्ड माईन्सच्या जमिनीवर असून ही एक केंद्र सरकारी कंपनी आहे, ज्य़ा कंपनीकडून 2001 पर्यंत केजीएफचं संचलन करण्यात आलं होतं. इथं संपूर्ण खोदकामापूर्वी राज्य शासनाची आवश्यक ती परवानगीसुद्धा घेण्यात आली होती. 

BGML मधील माजी अभियंता  KM दिवाकरन यांच्या नेतृत्त्वाखालील एक कर्मचारी समुह गेल्या काही काळापासून सातत्यानं इथं पुन्हा खोदकाम सुरू करण्याची मागणी करत आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रितसर पत्रही लिहिलं असून योजनेचा आवश्यक तपशील पुरवला आहे. दिवाकरन यांच्या दाव्यानुसार केजीएफमधून दरवर्षी जवळपास 100 टन सोनं मिळवता येऊ शकत, जे कैक पटींनी जास्त आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबईला बदलताना पाहिलेल्या 154 वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन पुलाचं नाव बदलणार; नवी ओळख असेल 'सिंदूर'

अडचणी कमी नाहीत... 

या खाणींच्या भागात पुन्हा एकदा खोदकाम, खाणकाम सुरू करणं ही आव्हानाची आणि तितकीच खर्चिक बाब ठरू शकते ही वस्तूस्थिती मात्र इथं नाकारता येत नाही.  KGF चे वकील पी राघवन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मागील 24 वर्षांमध्ये इथं 1400 लांबीच्या भूमिगत भुयारांमध्ये सायनाईडयुक्त विषारी पाणी साचलं आहे. तर, बहुतांश यंत्रसामग्री गंजली असून कालबाह्य झाली आहे. अशा परिस्थितीत इथं पुन्हा खाणकाम सुरू करणं अतिशय खर्चिक ठरेल. 

कधीकाळी हेच ठिकाण होतं, 'मिनी इंग्लंड...'

 कोलार गोल्ड फील्ड्स (KGF) हे तेच ठिकाण आहे जे कधीकाळी मिनी इंग्लंड म्हणूनही ओळखलं जात होतं. इथं असणारा गारठा, युरोपीय शैलीच्या इमारती, अँग्लो इंडियन समुदायाची वर्दळ या कारणानं हे जणू एक वेगळं जग होतं. ही जगातील दुसरी तर,  आशिया खंडातील पहिली वीजेवर चालणारी खाण परियोजना होती. 1902 मध्ये इंग्रजांनी केजीएफला वीजपुरवठा करण्यासाठी 220 किमी दूरवर शिवनसमुद्रा इथं हाइड्रोइलेक्ट्रिक प्लांट वसवला, ज्या माध्यमातून हे ठिकाण वीजपुरवठा असणारं पहिलं खाणीचं शहर ठरलं. 

Read More