प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर यांनी लग्नातील कार्यक्रमांमध्ये आपली पत्नी सतत डोक्यावर पदर घेऊन का होती याचा खुलासा केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध असणारे खान सर यांचं खरं नाव फैजल खान असून एक महिन्यांपूर्वी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांनी आपले कुटुंबीय, मित्र नातेवाईकांसाठी रिसेप्शन आयोजित केलं होतं. या सर्व कार्यक्रमांदरम्यान त्यांच्या पत्नीने डोक्यावरचा पदर काढत, चेहराच न दाखवल्याने सोशल मीडियावर खान सरांवर टीका करण्यात आली होती.
खान सर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं असून, हा आपल्या पत्नीचाच निर्णय होता असा खुलासा केला आहे. तिला गर्दीत इतरांपेक्षा वेगळं दिसायचं होतं, असं खान सरांनी सांगितलं आहे.
"लग्नात डोक्यावर पदर घेण्याचा निर्णय माझ्या पत्नीचा होता. ती म्हणाली की, हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि प्रत्येक मुलीचं डोक्यावर पदर घेऊन नवरीमुलीच्या रुपात उभं राहण्याचं स्वप्न असतं. तिच्या मते, जेव्हा नवरी डोक्यावर पदर घेते तेव्हा गर्दीत इतरांपेक्षा उठून दिसते," असं खान सरांनी सांगितलं आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, "ती म्हणाली लग्नात प्रत्येकाने चांगले कपडे घातलेले असताना, मी पदर घेतल्यास इतरांपेक्षा वेगळी दिसेन. मी तिला सांगितलं की, लोक मला दोष देतील. त्यावर तिने हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे असं सांगितलं. आपल्याला हे करायचंच आहे असा तिचा हट्ट होता. अखेर शेवटी मी तिला ठीक आहे म्हटलं".
ऑनलाइन टीकेचा तुमच्यावर काही परिणाम झाला का? असं विचारलं असता खान सर म्हणाले, "नाही आम्ही गावातील लोक आहोत, आणि आम्ही ते मागू सोडत नाही".
तुम्ही गाजावाजा न करता लग्न का केलं? असं विचारलं असता त्यांनी भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. "मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं नाही. जेव्हा भारत-पाकिस्तान तणाव सुरु होता तेव्हाच माझं लग्न झालं," असं ते एका विद्यार्थ्याला सांगताना एका व्हिडीओत ऐकू येत आहे.
"सुरुवातीला मला लग्न पुढे ढकलायचे होते आणि सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या सैनिकांना मदत करायची होती. पण माझ्या पालकांनी सर्व काही नियोजित केले होते आणि ते अस्वस्थ झाले होते. शेवटी, मी माफी मागितली. मी पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्या अचानक हल्ल्याबद्दल शाप दिला आणि लग्न करण्यास तयार झालो, परंतु कोणालाही आमंत्रित करणार नाही या अटीवर लग्न केलं," अशी माहिती खान सरांनी दिली आहे.